

आळेफाटा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी तसेच आळेफाटा परिसरात दहशत माजविणार्या लड्ड्याभाईला आळेफाटा पोलिसांनी अटक केली. सुनील उर्फ लड्ड्या गणेश शिंदे (वय 21, रा. वडारआळी, आळे, ता. जुन्नर) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कलमान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला खेड तालुक्यातील एका लॉजमधून ताब्यात घेण्यात आले.
लड्ड्याने एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी 8 मे रोजी आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी लड्ड्याच्या काही मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांनी लड्ड्याच्या ठिकाणाबाबत माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याला खेड तालुक्यातील एका लॉजमधून ताब्यात घेतले. त्याच्यावर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लड्ड्याची आळे, आळेफाटा परिसरात मोठी दहशत आहे. त्याच्यावर या आधीही गुन्हे दाखल झाले आहेत. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन आळेफाटा पोलिसांनी केले आहे.