पुणे : खोपोली-कुसगाव बोगद्याचे काम पूर्ण

पुणे : खोपोली-कुसगाव बोगद्याचे काम पूर्ण

पुणे; पुढारी वृत्तसेवा : द्रुतगती महामार्गावर आशिया खंडातील सर्वांत मोठा पूल उभारण्यात येत आहे. या पुलाचे पन्नास मीटरपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. तसेच खोपोली एक्झिट ते कुसगाव भागातील पर्यायी रस्त्याचे काम वेगाने सुरू असून, दोन्ही बोगद्यांंचे काम पूर्ण झाले आहे. सष्टेंबर 2024 पर्यंत सर्व काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, त्यानंतर पुणे-मुंबई महामार्गावरील प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. पुणे- मुंबई द्रुतगती मार्ग व मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे दोन्ही कॉरीडॉर सुधारणा तथा देखभाल, दुरुस्तीसाठी बीओटी (बांधा, वापरा व हस्तांतरीत करा) या तत्त्वावर 30 वर्षांच्या सवलतीच्या कालावधीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरीत केले आहेत.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे खालापूर टोल प्लाझाजवळ एकत्र मिळतात व पुढे खंडाळा एक्झिट येथे वेगळे होतात. अडोशी बोगदा ते खंडाळा एक्झिट ही रुंदी सहा पदरी असून, या भागात 10 पदरी वाहतूक येऊन मिळते. मुंबईकडे येणारी डोंगरालगतची एक लेन पावसाळ्यात बंद ठेवावी लागते. या पार्श्वभूमीवर मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील 13.3 किलोमीटर लांबीच्या मिसिंग लिंकचे काम एमएसआरडीसीने हाती घेतले आहे.

या प्रकल्पामुळे बोरघाटातील 6 किमी वळणाच्या मार्गाला हा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणार्‍या केबल पुलाची लांबी 645 मी. आणि उंची 135 मीटर असणार आहे. हा आशिया खंडातील सर्वांत मोठा दरीवरील पूल असल्याचा दावा एमएसआरडीसीकडून करण्यात येत आहे. पुलाचे काम वेगाने सुरू असून, आतापर्यंत 50 मीटर उंचीपर्यंतचे पुलाचे पूर्ण झाले आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. पुणे-मुंबई रस्त्यावरील मिसिंग लिंकचे काम गतीने सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत दोन्ही बोगद्यांचे काम पूर्ण झाले आहे. पन्नास मीटर उंचीपर्यंत केबल पूल उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे, असे एमएसआरडीसीचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news