

Khelo India Youth Games Sangli Yash Khandagale gold medal
पुणे : वेटलिफ्टिंगमधील महाराष्ट्राचा सुवर्णपदकाचा धडाका 7व्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत दुसर्या दिवशीही कायम राहिला. सांगलीच्या यश खंडागळेने 67 किलो गटात सुवर्ण‘यश’ मिळवित आजचा दिवस गाजविला. टेनिस एकेरीत महाराष्ट्राच्या अर्णव पापरकर, ऐश्वर्या जाधव यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
राजगीर क्रीडा विद्यापीठाचा परिसरात ही स्पर्धा सुरू आहे. वेटलिफ्टिंग स्पर्धेत पहिल्याच प्रयत्नात सांगलीच्या यशने स्नॅच प्रकारात 122 किलोची सर्वोत्तम कामगिरी नोंदविली. पाठोपाठ क्लिन अॅण्ड जर्क प्रकारातही पहिल्याच प्रयत्नात त्याने 145 किलो हे सर्वाधिक वजन पेलले. स्नॅच व क्लिन अँन्ड जर्क प्रकारात दुसर्या व तिसर्या प्रयत्नात अधिक वजन उचलण्यात तो अपयशी ठरला. पहिल्याच प्रयत्नात सर्वोत्तम कामगिरी करीत एकूण 267 किलो वजनाची खेळी करीत यशने सुवर्णपदकाला गवसणी घातली.
आसामच्या अभिनोब गोगाईने 251 किलो तर हरियाणाच्या समीर खानने 241 किलो वजनाची कामगिरी करीत अनुक्रम रौप्य व कांस्य पदकाचा नाव कोरले. सुवर्णपदक विजेता यशचे खेलो इंडिया स्पर्धेतील हे पहिलेच पदक आहे. 2023 मधील मध्यप्रदेशमधील स्पर्धेत तो 8व्या स्थानावर होता. गत तामिळनाडू स्पर्धेत तो पात्र ठरला नव्हता. सांगलीत यशच्या वडिलांचे सलूनचे छोटेखानी दुकान असून तो मयुरा सिंहासने यांच्या व्यायामशाळेत कसून सराव करत असतो. तब्बल 2 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर यशचे पदकाचे स्वप्न साकार झाले आहे. आता राष्ट्रकुल पदक जिंकण्याचे ध्येय आहे, असा निर्धार यशने व्यक्त केला.
टेनिस एकेरीत महाराष्ट्राच्या अर्णव पापरकर, ऐश्वर्या जाधव यांनी विजयी वाटचाल कायम राखत स्पर्धेतील उपांत्य फेरीत मजल मारली आहे. पाटना शहरात सुरू असलेल्या टेनिस स्पर्धेतील उपांत्यपूर्व लढतीत महाराष्ट्राच्या अर्णप पापरकर याने दिल्लीच्या रियान शर्माला 7-6, 6-2 असे सरळ सेटमध्ये नमवले. पहिल्या सेटमध्ये रियानने प्रयत्नाची शर्थ केली. जोरदार स्मॅशेस करत आक्रमक खेळी करीत अर्णवने अटीतटीच्या पहिल्या सेटमध्ये विजय संपादन केला. दुसर्या सेटमध्ये सुरूवातीपासून आघाडी घेत अर्णवने लढतही जिंकली. कराडमधील अर्णव प्रथमच खेलो इंडिया स्पर्धेत खेळत असून, तो पुण्यात सराव करीत असतो.
मुलींच्या एकेरीतही महाराष्ट्राच्या ऐश्वर्या जाधव हिने उपांत्य लढत जिंकली. कर्नाटकच्या कशवी सुनीलला 6-3, 6-2 असे सेटमध्ये नमवित ऐश्वर्या जाधव हिने सलग दुसर्या वर्षी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. मुलींच्या दुहेरीतही ऐश्वर्या जाधव व आकृती सोनकुसारे जोडीने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व लढतीत हरियाणा आदिती रावत व आदिती त्यागी यांनी पुढे चाल दिल्याने महाराष्ट्राने उपांत्य फेरी गाठली आहे. गत स्पर्धेत तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. कोल्हापूरची ऐश्वर्या सध्या अहमदाबाद येथील अॅकॅडमीत सराव करीत असते.