खडकवासला : खडकवासला धरणाच्या बांधकामाच्या वेळी 1879 मध्ये इंग््राज राजवटीत व 1950 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खडकवासला ते एनडीए (राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी) मुठा नदीवर बांधलेला एनडीए-खडकवासला रस्त्यावरील पूल धोकादायक असल्याचे तांत्रिक पाहणीत स्पष्ट झाले आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पालिका प्रशासनाने पुलावरील अवजड व उंच वाहनांची वाहतूक बंद केली असून, त्यासाठी तातडीने आवश्यक प्रतिबंधक कमान उभारली तसेच फलकही लावले आहेत. (Latest Pune News)
या पुलावरून एनडीए, डीआयटी अशा लष्कराच्या महत्त्वाच्या संस्थांच्या वाहनांची तसेच जलसंपदा विभागासह धरण परिसरातील 50 हून अधिक गावांतील रहिवाशांची व पर्यटकांची वाहतूक सुरू असते. त्यामुळे पालिका प्रशासनाने पुलाच्या दुरुस्तीची कार्यवाही वेगाने सुरू केली आहे.
पालिकेच्या पथ विभागाचे कनिष्ठ अभियंता संभाजी कवठे म्हणाले, तांत्रिक पाहणीत पूल जीर्ण झाल्याचे दिसून आले. एकूण वाहतूक क्षमतेच्या निम्मीही क्षमता नसल्याने सुरक्षेसाठी तातडीने अवजड वाहतूक बंद केली आहे. पुलाच्या दुरुस्तीची प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, येत्या दोन आठवड्यात प्रत्यक्षात पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार आहे.
इंग््राज राजवटीत खडकवासला धरण बांधले, त्याआधी या ठिकाणी कोपरे व खडकवासला गावच्या मधून वाहणाऱ्या मुठा नदीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात छोटे धरण होते. भिकारदा धरण म्हणून या धरणाची ओळख होती. या धरणाच्या बांधावरून पावसाळ्यात व इतर दिवशी वाहतूक सुरू असे.
12 जुलै 1961 रोजी पानशेत धरण फुटले. त्या वेळी पुणेकर व परिसरातील पूरस्थिती आटोक्यात आणण्यासाठी इंग््राज राजवटीतील खडकवासला धरण बॉम्ब टाकून फोडले, त्यांचे भग्न अवशेष या परिसरात आहेत. स्वातंत्र्यानंतर बांधलेल्या सध्याच्या पुलाचे जवळपास सर्वच खांब धरणातून सोडणाऱ्या पाण्याच्या लोंढ्यामुळे कमजोर झाले आहेत.
खांबाचे भराव कुमकुवत झाले आहेत. अनेक ठिकाणी भगदाडे पडली आहेत. त्यामुळे प्रचंड अवजड व इतर वाहतुकीमुळे पूल जमीनदोस्त होऊन मोठ्या दुर्घटनांची टांगती तलवार उभी आहे. याची दखल घेऊन प्रशासनाने अवजड वाहतूक बंद केली आहे. कार, छोटे टेम्पो, रिक्षा, दुचाकी अशा हलक्या वाहनांची वाहतूक सुरू ठेवली आहे. त्यामुळे या पुलावर वाहतुकीचा ताण वाढला आहे.
खडकवासला धरणाच्या सांडव्याखालील मुठा नदीपात्रावर हा पूल आहे. पुलाची लांबी जवळपास दीडशे मीटर लांबी आहे. धरण तसेच सांडवा पाहण्यासाठी पुलावर सुट्टीच्या व इतर दिवशी पर्यटकांसह फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते गर्दी करतात. त्यामुळे पुलावर प्रचंड वाहतूक कोंडी होऊन खडकवासला धरणमाथ्यापर्यंत दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागतात. त्यामुळे सुरक्षेसाठी खडकवासला धरण जलसंपदा विभाग तसेच उत्तमनगर व नांदेड सिटी पोलिसांनी आवश्यक बंदोबस्त तैनात केला आहे.
अलीकडच्या काळात पुलावर अवजड वाहतुकीसह इतर वाहतूक वाढली आहे. तसेच, पावसाळ्यात दोन-तीन महिने खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात जादा प्रमाणात पाणी सोडले जात आहे. नदीपात्रातील पाण्याच्या लोंढ्यामुळे पुलाच्या नदीपात्रातील खांबांना तडे गेले आहेत. अनेक ठिकाणी खांब, नदीपात्रातील बांधकाम खचले आहे. त्यामुळे पूल कोसळण्याचा धोका आहे.
- सौरभ मते, माजी सरपंच, खडकवासला