

खडकवासला: श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी (दि. १३) पानशेत-वरसगाव खोऱ्यासह घाट माथ्यावर सरी कोसळल्या. यामुळे खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांतून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला.
दिवसभरात वरसगाव येथे १५, पानशेत येथे १३, टेमघर येथे ७ व खडकवासलात १ मिलिमीटर पाऊस पडला. सांडव्यातून जादा पाणी सोडूनही श्रावण सरीमुळे चारही धरणांतील पाण्याची पातळी शंभर टक्क्यांवर स्थिर आहे.
वरसगाव धरणातून २ हजार ८८, पानशेतमधून ६०० आणि टेमघरमधून ५२२ क्युसेक पाणी सोडले जात आहे, तर खडकवासलातून मुठा नदीच्या पात्रात १ हजार ९२९ क्युसेकचा विसर्ग सुरू आहे.
याशिवाय शहर व जिल्ह्यातील नागरिकांना पिण्यासाठी १ हजार ६८४ क्युसेकने पाणी सोडले जात आहे. खडकवासला धरणाचे शाखा अभियंता विरेश राऊत म्हणाले, की सर्व धरणे भरल्याने पावसाच्या प्रमाणानुसार कमी जास्त पाणी सांडव्यातून सोडले जात आहे.