खडकवासला: दोन दिवसांच्या उघडिपीनंतर गुरुवारी धरणक्षेत्रात पुन्हा हलक्या पावसाने हजेरी लावली. खडकवासला धरणाखालील नांदेड, खडकवासला आणि सिंहगड परिसराला सायंकाळी मुसळधार पावसाने झोडपून काढले.
पाण्याची आवक वाढल्याने खडकवासला धरणातून रात्री आठ वाजता मुठा नदीत पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला असून, सध्या एक हजार 263 क्युसेकने पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. (Latest Pune News)
धरणसाखळीत सायंकाळी पाच वाजता खडकवासला धरणसाखळीत 29.06 टीएमसी म्हणजे 99.70 टक्के पाणीसाठा झाला होता. खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे म्हणाले की, धरणांच्या क्षेत्रात हलका पाऊस पडत आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून पुन्हा मुठा नदीत विसर्ग सुरू केला आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास जादा पाणी सोडण्यात येणार आहे त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
खडकवासला धरणाखालील सिंहगड रस्ता, किरकटवाडी, खडकवासला, धायरी, नांदेड, वडगाव परिसरात दुपारपासून सायंकाळी उशिरापर्यंत मुसळधार पावसामुळे झोडपून काढले. सिंहगड किल्ल्याच्या परिसरात डोणजे, गोऱ्हेपर्यंत जोरदार पाऊस पडला. तेथून पुढे खानापूर, पानशेत, वरसगाव परिसरात हलका पाऊस पडला.
खडकवासला धरणसाखळी
एकूण पाणी साठवणक्षमता 29.15 टीएमसी
सोमवारचा पाणीसाठा
29.06 टीएमसी (99.70 टक्के)