खडकवासला : पानशेत खोर्यात पावसाचा जोर वाढल्याने बुधवारी (दि. 2) रात्रीपासून गेल्या 24 तासांत खडकवासला धरण- साखळीतील पाणीसाठ्यात एक टीएमसीपेक्षा अधिक वाढ झाली. त्यामुळे खडकवासला धरणाच्या विसर्गात टप्प्या-टप्प्याने वाढ करण्यात आली. सध्या धरणातून 8 हजार 522 क्युसेक वेगाने पाणी मुठा नदीत सोडले जात आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
धरणसाखळीत गुरुवारी (दि. 3) सायंकाळी पाच वाजता 16.78 टीएमसी म्हणजे 57.57 टक्के पाणीसाठा झाला होता. बुधवारी (दि. 2) सायंकाळी पाच वाजता धरणसाखळीत 15.74 टीएमसी इतके पाणी होते. गेल्या 24 तासांत धरणसाखळीत 1.04 टीएमसीची भर पडली. बुधवारी रात्रीपासून पहाटेपर्यंत जोरदार पाऊस पडला. गुरुवारी सकाळपासून पावसाचे प्रमाण कमी झाले; मात्र ओढ्या-नाल्यांतुन धरणात पाण्याची आवक सुरू आहे. बुधवारी सकाळी सहा ते गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या 35 तासात टेमघर येथे 105 मिलिमीटर पाऊस पडला तर याच कालावधीत वरसगाव येथे 78, पानशेत येथे 73 व खडकवासला येथे 23 मिलिमीटर पाऊस पडला. गुरुवारी सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र, सायंकाळी साडेपाच वाजेपासून पानशेत-वरसगाव खोर्यात रिमझिम वाढली आहे. अधुनमधून जोरदार सरी पडत आहेत. वरसगावमध्ये 61 टक्क्यांहून अधिक तर पानशेतमध्ये 55.55 टक्के साठा झाला आहे. टेमघर देखील 50 टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. टेमघरमध्ये सध्या 45.50 टक्के साठा झाला आहे.
एकूण पाणी साठवणक्षमता
29.15 टीएमसी
गुरुवारचा पाणीसाठा
16.78 टीएमसी
(57.57 टक्के)