

वेल्हे : पानशेत- वरसगाव खोर्यासह रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्यावर सोमवारी (दि. 25) सकाळपासून पुन्हा पावसाची संततधार सुरू झाली. धरणसाठ्यात पाण्याची आवक वाढल्याने सायंकाळी पाच वाजता खडकवासला धरणातून मुठा नदीच्या विसर्गात 6 हजार 515 क्युसेकपर्यंत वाढ करण्यात आली. पावसाचा जोर वाढल्यास नदीत जादा पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे प्रशासनाने मुठा नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सायंकाळी पाच वाजता खडकवासला धरण साखळीत 28.27 टीएमसी म्हणजे 96.98 टक्के पाणीसाठा झाला होता. संततधार पावसामुळे चारही धरणात पाण्याची आवक वाढली आहे. वरसगाव धरणातून 2 हजार 48 क्युसेक, पानशेतमधून 600 तर टेमघरमधून 1 हजार 211 क्युसेक पाणी सोडले जात आहे.
मागील तीन ते चार दिवसांपासून धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला होता, त्यामुळे पाण्याची आवक कमी झाली होती. परिणामी खडकवासलाचा विसर्ग कमी करण्यात आला होता. दरम्यान सोमवारी सकाळपासून घाटमाथ्यासह आंबेगाव, शिरकोली, माणगाव पोळे, तव आदी ठिकाणी संततधार पावसामुळे नद्या, ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत.
पानशेत, वरसगाव, टेमघर आणि मुठा खोर्यासह खडकवासला धरणक्षेत्रात सकाळपासून चांगला पाऊस पडत असल्याने पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे खडकवासलाच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. पावसाचा जोर वाढल्यास जादा पाणी नदीत सोडण्यात येणार आहे. -
मोहन भदाणे, उपविभागीय अभियंता, खडकवासला जलसंपदा विभाग