वेल्हे : मुठा नदीत पाणी सोडणे बंद केल्यानंतर खडकवासला धरणातून मुठा कालव्यातून शेतीला पावसाळी आवर्तन सुरू करण्यात आले आहे. दौंड, हवेली, इंदापूर, बारामती तालुक्यातील 66 हजार हेक्टर जमिनीला या आवर्तनाचा लाभ मिळणार आहे. सोमवारी (दि. 4) सायंकाळी पाच वाजता खडकवासला धरणसाखळीत 25.88 टीएमसी म्हणजे 88.79 टक्के साठा झाला होता. (Pune News Update)
धरणक्षेत्रात तुरळक अपवाद वगळता गेल्या पाच दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे, त्यामुळे धरणसाठ्यातील पाण्याची आवक मंदावली आहे. खडकवासला धरण विभागाच्या शाखा अभियंता गिरिजा कल्याणकर - फुटाणे म्हणाल्या, सकाळी सहा वाजल्यापासून खडकवासलातून शेतीला पावसाळी आवर्तन सुरू करण्यात आले. सध्या 500 क्सुसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. मंगळवारपासून (दि.5) वाढ करून 700 क्सुसेक वेगाने पाणी सोडले जाणार आहे .
उन्हाळी आवर्तनानंतर मे पासून शेतीचे पाणी बंद करण्यात आले होते. तीन महिन्यांनंतर खडकवासलातून शेतीला पाणी सोडले जात आहे. अद्याप पावसाळ्याचे दोन महिने शिल्लक आहेत. खडकवासला धरणसाखळी तुडुंब भरून वाहत आहे. त्यामुळे शेतीसह पिण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध आहे.
वरसगाव व पानशेत धरणांची पातळी 90 टक्क्यावर तर टेमघर धरणाची पातळी 95 टक्क्यांहून अधिक आहे. पानशेत व वरसगावमधून खडकवासलात प्रत्येकी 600 क्सुसेक पाणी सोडले जात आहे. या धरण खोर्यातील ओढ्या- नाल्यांच्या पाण्याची भर पडत असल्याने पिण्यासाठी तसेच शेतीला पाणी सोडूनही खडकवासला धरणाची पातळी 64 टक्क्यांहून अधिक आहे.
सोमवारी पानशेत येथे तुरळक 2 मिलिमीटर पावसाचा अपवाद वगळता इतर तिन्ही धरणमाथ्यावर पावसाची दिवसभर उघडीप होती.