

पुणे : शिवणे परिसरात पब्जी गेम खेळणार्या तरुणांना गावठी पिस्तुलाशी खेळने चांगलेच अंगलट आले आहे. पिस्तुलासोबत खेळ करताना चुकून फायर झालेली गोळी लागून एक जण जखमी झाला आहे. दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी अल्पवयीन मुलाचे नाव पुढे केले. मात्र, चौकशीत खरा प्रकार उघड झाला आणि उत्तमनगर पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर यांनी फिर्याद दिली आहे. (Pune News Update)
संकेत संजय मोहिते (वय 20) असे गोळी पायाला लागून जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर पोलिसांनी मोहिते याच्यासह सागर प्रदीप कोठारी (वय 22), पार्श्वनाथ शिरीष चाकोते (वय 25), जाफर सादिक अली शेख (वय 20), वैभव लक्ष्मण धावडे (वय 22) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवार-रविवारच्या मध्यरात्री दीडच्या सुमारास शिवणेतील सरस्वतीनगर परिसरात संकेत, सागर, पार्श्वनाथ, जाफर, वैभव आणि एक अल्पवयीन मुलगा हे जाफर याच्या घरी बसून मोबाईलवर पब्जी गेम खेळत होते. खेळादरम्यान सागर कोठारीने त्याच्याकडे असलेले पिस्तूल बाहेर काढून मित्रांना दाखवले. तो लोड-अपलोड करत असताना पिस्तूल लॉक झाले. त्या वेळी पार्श्वनाथ चाकोते याने पिस्तूल हातात घेतले. पाहणीदरम्यान पिस्तुलातून अचानक गोळी सुटली आणि ती थेट संकेत मोहितेच्या पायाच्या नडगीत घुसली. तो रक्तबंबाळ अवस्थेत कोसळला. मित्रांनी त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले.
गोळी लागल्याची माहिती रुग्णालयाने उत्तमनगर पोलिसांना दिली. रात्रगस्तीवरील उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर पथकासह घटनास्थळी पोहचले. सुरुवातीला संकेत मोहिते याने अल्पवयीन मुलाकडून चुकून गोळी लागल्याचे सांगितले. मात्र, चौकशीत हा मुलगा निर्दोष असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर सागर कोठारी याने खरा प्रकार कबूल केला. त्याच्या पिस्तुलातून पार्श्वनाथ याच्याकडून गोळी सुटल्याचे उघड झाले. या घटनेनंतर पोलिसांनी सागर कोठारी, पार्श्वनाथ चाकोते आणि इतर मित्रांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून पिस्तूल जप्त केले आहे. पिस्तूल कुठून आणले, ते कायदेशीर आहे का, याचा तपास सुरू आहे. तसेच, घटनेनंतर मित्रांनी पोलिसांना दिलेली खोटी माहिती आणि अल्पवयीन मुलाचे नाव पुढे करून केलेल्या दिशाभूलप्रकरणीही गुन्हा नोंदविण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन खंदारे यांनी सांगितले.