

पुणे: आपला बाप्पा यंदा आपणच घडवायचा आणि तोही पर्यावरणपूरक! या भावनेतून तळजाई येथील चाटे पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात शाडूच्या मातीपासून गणरायाच्या विलोभनीय मूर्ती साकारल्या.
दै. 'पुढारी' माध्यम समूह, पुणे महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'माझा बाप्पा-२०२६' या उपक्रमाअंतर्गत गुरुवारी ही विशेष कार्यशाळा पार पडली.
स्वतःच्या हातांनी घडवलेल्या या मूर्ती घरी नेऊन त्यांचीच प्राणप्रतिष्ठा करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला असून, त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला. यावेळी चाटे पब्लिक स्कूल शिक्षण समूहाचे संचालक फुलचंद चाटे यांच्यासह स्कूलच्या प्रिन्सिपल नवनीत कौर-राजपाल, प्रिन्सिपल रणजित जगताप, स्पोर्टस टीचर ओंकार खिल्लारे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमाला सॉलिटर ग्रुप, गोयल गंगा ग्रुप, बढेकर ग्रुप, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यापीठ पुणे, ऑटोट्रॉनिक्स इंजिनीअरिंग प्रा. लि. आणि केले ग्रुप सहप्रायोजक आहेत. या कार्यशाळेच्या माध्यमातून गणेशभक्ती, कलागुणांना वाव आणि पर्यावरणपूरक उत्सवाचा संस्कार, असा तिहेरी संगम चाटे पब्लिक स्कूलमध्ये पाहायला मिळाला.
भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाइन आर्ट्सच्या शिल्पकला विभागाचे प्रमुख सुनील देशपांडे, प्रा. ओंकार पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत सोप्या पद्धतीने मूर्तीनिर्मितीचे प्रशिक्षण दिले. त्यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी मातीला आकार देत कल्पक गणेशमूर्ती तयार केल्या. शालेय वयातच पर्यावरणाची जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात रुजावी, या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन केले होते.
मूर्ती घडवण्यासोबतच विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्वही समजावून सांगण्यात आले. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण, नैसर्गिक साधनांचे जतन आणि सण-उत्सव पर्यावरणाला पूरक पद्धतीने साजरे करण्याची गरज याविषयी तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. मुलांनी स्वतः साकारलेल्या या शाडूमातीच्या पर्यावरणपूरक मूर्तींची पालकांनी घरी उत्साहाने प्राणप्रतिष्ठा करावी, असे आवाहनही या वेळी करण्यात आले.
हर्षोल्हासात घडला बालमनांचा गणराया
चाटे पब्लिक स्कूलचा परिसर गुरुवारी गणेशभक्ती आणि उत्साहाने फुलून गेला होता. हातात शाडूची माती, चेहऱ्यावर कुतूहल आणि मनात आपला बाप्पा स्वतः घडवण्याची ओढ, अशा चैतन्यमयी वातावरणात बालशिल्पकरांनी मूर्ती साकारल्या. मातीला आकार देताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि पर्यावरणपूरक उत्सवाचा उत्साह वातावरणात एक वेगळीच ऊर्जा भरत होता.
चाटे स्कूलमध्ये दै. 'पुढारी' आणि चाटे स्कूलच्या विद्यमाने माझा बाप्पा म्हणजेच शाडूमातीपासून गणपती बनवण्याचा उपक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांना पर्यावरणाबाबत जनजागृती व्हावी, हा यामागचा उद्देश होता. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळाले असून, विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेतला.
- फुलचंद चाटे, संचालक, चाटे शिक्षण समूह
दै. 'पुढारी'च्या वतीने आयोजित केलेल्या माझा बाप्पा उपक्रमात आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेऊन शाडूमातीपासून बाप्पाचा मूर्ती घडवल्या. या उपक्रमामुळे मुलांमध्ये पर्यावरणविषयक जनजागृती होत आहे. पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती घडवणारा हा उपक्रम आमच्या स्कूलमध्येही दरवर्षी व्हावा, अशी आमची इच्छा आहे.
- नवनीत कौर-राजपाल, प्रिन्सिपल, चाटे पब्लिक स्कूल
दै. 'पुढारी'च्या वतीने माझा बाप्पा हा उपक्रम आमच्या स्कूलमध्ये घेण्यात आला. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. शाडूमातीची मूर्तीच का वापरावी? यामुळे पर्यावरणाचे संरक्षण कसे होते? याची माहिती आमच्या विद्यार्थ्यांना मिळाली. सध्या जे प्रदूषण वाढत आहे, ते रोखण्यासाठी शाडूमातीची मूर्ती किती महत्वपूर्ण आहे, याची माहितीही यावेळी विद्यार्थ्यांना मिळाली. तसेच त्यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची प्रेरणा मिळाली.
- रणजित जगताप, प्रिन्सिपल, चाटे पब्लिक स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज
गेल्या काही वर्षांपासून आम्ही दै. 'पुढारी'सोबत मिळून पर्यावरणपूरक गणेशोत्सवासंदर्भात जनजागृती करत विद्यार्थ्यांना शाडूमातीचे गणपती घडवण्याचे प्रशिक्षण देतो. शालेय वयातच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक आवड रूजणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही शाळांच्या माध्यमातून ही जनजागृती करण्यावर भर देत आहोत. दै. 'पुढारी'चे आम्हाला याकरिता मोठे सहकार्य लाभत आहे.
- सुनील देशपांडे, प्रमुख, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाइन आर्ट्सच्या शिल्पकला विभाग