Khadakwasla Dam : खडकवासला धरणक्षेत्र अतिक्रमणांच्या विळख्यात

खडकवासला जलसंपदा विभाग हतबल; पोलिसही दाद देत नसल्याचे चित्र समोर
Pune news
खडकवासला धरणक्षेत्र Pudhari
Published on
Updated on

खडकवासला : खडकवासला धरणाच्या पाणलोटक्षेत्राला अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. धरणक्षेत्रातच दगड, मुरूम, राडारोड्याचा भराव, खाद्यपदार्थ विक्रेत्यांसह धनदांडग्यांनी हॉटेल, शेड आदी बांधकामाचा सपाटा सुरू केला आहे. दुसरीकडे अतिक्रमणे काढण्यासाठी धावाधाव करणार्‍या खडकवासला जलसंपदा विभागाला अतिक्रमण करणारे तसेच पोलिसही दाद देत नसल्याचे गंभीर चित्र पुढे आले आहे.

पुणेकर तसेच शेतीला पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी माजी लष्करी अधिकारी सेवानिवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी ग्रीन थंब संस्था व लोकसहभागातून पंधरा वर्षांपूर्वी खडकवासला धरणातील गाळ काढण्याचे काम सुरू केले. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील लाखो टन गाळ काढून धरण तिरावरील ओसाड पडीक जमिनीवर लाखो वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच, गार्डन, पादचारी मार्ग, दशक्रिया विधी घाट, देवराई, पक्षी वन्यजीव संवर्धन आदी विकासकामे राबविण्यात आली. असे असतानाही पुणे-पानशेत रस्त्यावरील खडकवासला येथील भारतीय लष्कराच्या डीआयटी संस्थेजवळ ज्या ठिकाणी धरणातील गाळ, दलदल काढून वनीकरण करण्यात आले, त्याठिकाणी भराव टाकून खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी बेकायदा चौपाटी थाटली आहे. असेच गंभीर चित्र धरणाच्या दोन्ही तिरांवर दिसून येत आहेत.

Pune news
Pune Crime News: दोन हजार रुपयांसाठी केला युवकाचा खून; दोघांना जन्मठेप

दोन्ही तिरांवर यापूर्वीच मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. आणीबाणीच्या प्रसंगी धरणात उतरण्यासाठी जलसंपदा विभागाच्या मालकीच्या सरकारी वहिवाटीचे मार्गही अतिक्रमणांमुळे बंद झाले आहेत. यात आता नव्या अतिक्रमणांची भर पडली आहे. पानशेत रस्त्यावरील गोर्‍हे खुर्द, खानापूर आदी गावांच्या हद्दीतील खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दगड, खडी, मुरूम, मातीचे भराव टाकून थेट पाणलोट क्षेत्रावरच बेकायदा ताबा घेण्यात आला आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्र कमी होऊन पाणी साठा कमी होत आहे

Pune news
Pune Politics: शहरातील जीवन हलाखीचे झालेय; मेधा कुलकर्णी यांचा भाजपला ‘घरचा आहेर’

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी धरणक्षेत्रातील व धरणाच्या संपादित सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे काढण्यात यावीत, असे आदेश संबंधित जलसंपदा अधिकार्‍यांना दिले आहेत.

खडकवासला धरण जलसंपदा विभागाच्या वतीने संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत. असे असले तरी नोटिसा देणार्‍या अधिकार्‍यांनाच अतिक्रमणे करणारे दमदाटी करत आहेत. अतिक्रमण केलेल्या टपर्‍यात मद्य विक्री, मद्यपान करून धिंगाणा असे प्रकार वाढले आहेत. धनदांडग्यानी मोठ्या प्रमाणात जलसंपदा विभागाच्या संपादित सरकारी जमिनी बळकावल्या आहेत.

खडकवासला धरणातून गाळ काढून खडकवासला, गोर्‍हे बुद्रुक येथील तिरावरील शंभर ते दीडशे एकर जमीन वनीकरण, पक्षी वन्यजीव संरक्षण केंद्र आदी विकासकामांसह रितसर जलसंपदा विभागाच्या ताब्यात देण्यात आली. मात्र, समाजकंटकानी रातोरात वनीकरण उद्ध्वस्त करून अतिक्रमणे केली आहेत.

- कर्नल सुरेश पाटील, अध्यक्ष, ग्रीन थंब संस्था

खडकवासला धरण जलसंपदा विभाग

शासनाचे लक्ष वेधूनही प्रशासन सुस्त धरणक्षेत्रात व तीरावरील गोठे, कंपन्या, बंगले फार्म हाऊस, हॉटेल, रिसॉर्टचे सांडपाणी, कचरा राडारोडा धरणात मिसळून पाण्याचे प्रदूषण वाढले आहे. सध्या पडत असलेल्या पावसामुळे धरणतीरावरील पाण्यावर काळसर रंगाचा तवंग पसरला आहे. खडकवासला धरणातील पाण्याच्या गंभीर प्रदूषणाकडे स्थानिक आमदार भीमराव तापकीर यांनी थेट विधिमंडळात शासनाचे लक्ष वेधूनही प्रशासन सुस्त आहे.

या सर्व अतिक्रमणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. भारतीय लष्कराच्या डीआयटी संस्थेचे सांडपाणी धरणात येत आहे त्यामुळे त्यांनाही नोटीस बजावली आहे. या संस्थेजवळ धरणक्षेत्रात भराव टाकून अतिक्रमण केले आहे, याबाबत संबंधित हॉटेल, खाद्य पदार्थ विक्रेत्यांविरोधात पोलिसांत तक्रार करूनही दखल घेतली जात नाही.

गिरिजा कल्याणकर, शाखा अभियंता,

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news