खडकवासला कालवा, वितरिकांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष; इंदापुरातील चित्र

खडकवासला कालवा, वितरिकांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष; इंदापुरातील चित्र

कळस(पुणे); पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकरी खडकवासला कालवा व वितरिकांच्या दुरुस्तीची मागणी करीत असताना जलसंपदा विभाग मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. परिणामी, लाभधारक शेतकर्‍यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना हा शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न दिसत नाही का? असा प्रश्न लाभधारक शेतकर्‍यांमधून उपस्थित होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील या कामांसाठी जलसंपदा विभाग निधीची तरतूदच करीत नसल्याचे चित्र आहे.

तालुक्यातून दिलेला प्रस्तावही अद्याप धूळ खात पडला आहे. वरील तालुक्यांना निधी मंजूर होतो. मात्र, इंदापूर तालुक्याच्या शेवटच्या टोकाच्या वाट्याचा निधी जातो कुठे? असा प्रश्न विचारला जात आहे. खडकवासला कालव्यावर इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे, निरगुडे, अकोले, कळस, रुई, न्हावी, तरंगवाडीपर्यंतचे अनेक पाझर तलाव, छोट्या-मोठ्या बंधार्‍यांसह अनेक गावांतील पाणी योजना व शेतीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. मात्र, पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने हजारो एकरांवरील क्षेत्र अद्याप पडीकच आहे.

वितरिका, कालव्यात मोठ्या प्रमाणात गाळ

खडकवासला कालवा व वितरिकांची गेल्या अनेक वर्षांपासून दयनीय अवस्था झाली आहे. वितरिका व कालव्यात मोठ्या प्रमाणावर गाळ साठलेला आहे. गाळात दगडगोटे, झाडेझुडपे वाढलेली आहेत. परिणामी, हजारो हेक्टर क्षेत्र अद्याप पाण्याविना पडीकच आहे. काही ठिकाणी तर वितरिकांचे अस्तित्वच नष्ट झाले आहे. काही ठिकाणी एक किलोमीटर अंतरापेक्षा पुढे पाणीच जात नाही.

शेतकर्‍यांनी शोधले पर्याय

खडकवासला कालव्याच्या पाण्याची शाश्वती नसल्याने शेतकर्‍यांनी पर्याय शोधायला सुरुवात केली आहे. काही शेतकर्‍यांनी उजनी जलाशयातून चार ते पाच किलोमीटर अंतर पार करून सामूहिक जलवाहिन्यांद्वारे पाणी आणले आहे. अनेक शेतकर्‍यांनी पाणी साठवून उन्हाळ्यात उपयोगात आणण्यासाठी शेततळी उभारली आहेत. मात्र, सर्वच शेतकर्‍यांना हे शक्य नसल्याने जलसंपदा विभागाने या कामांकडे लक्ष देण्याची गरज आहे. या भागातील वितरिकांची दुरुस्ती झाल्यास हजारो एकरावरील शेती बागायती होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news