

खेड : ठेकेदारी मिळवण्यासाठी खेड सेझ हद्दीतील निमगाव येथे ह्योसाँग टी अँड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे असिस्टंट जनरल मॅनेजर तेजपाल नंदराम सिंग यांच्यावर चार अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि. १९) रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती.
फिर्यादी रावसाहेब मच्छिंद्र पाटील (कार चालक) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ते त्यांच्या कार (क्र. एम एच १४ एल एक्स २५८१)मधून मॅनेजर तेजपाल सिंग, राहुल सिंग आणि अंकुर गोयल यांना घेऊन निमगाव येथील कंपनीतून मोशी येथे निघाले होते. खेड सिटी येथील होंडा कंपनीसमोरील रस्त्यावर एका काळ्या रंगाच्या नंबरप्लेट नसलेल्या एका कारने समोरा-समोर येऊन त्यांची सिंग यांची गाडी अडवली. या गाडीतून उतरलेल्या चार व्यक्तींनी फिर्यादींच्या कारची किल्ली हिसकावून घेतली आणि तेजपाल सिंग यांना खाली ओढून शिवीगाळ आणि मारहाण केली. हल्लेखोरांनी; कंपनीची जागा आमची आहे, कंपनीतील कॉन्ट्रॅक्ट आम्हालाच मिळायला हवे, असे म्हणत बाहेरील लोकांना कॉन्ट्रॅक्ट देण्यास विरोध दर्शवला. यानंतर त्यांनी फिर्यादींना धमकावून गाडी घेऊन जाण्यास सांगितले.
खेड पोलीसांनी तात्काळ तपास सुरू करून चारही आरोपींची ओळख पटवली. अटक करण्यात आलेले आरोपींमध्ये विश्वास बाळासो पवळे (वय २९, रा. वाकळवाडी), अक्षय नवनाथ गोरे (वय २९, रा. माळअळी-चाकण), विपुल भीमाशंकर थिगळे (वय २४, रा. वरची ढोरे, भांबुरवाडी) आणि दीपक रामदास सांडभोर (वय २५, रा. पानमळा, ता. खेड) यांचा समावेश आहे.
या घटनेसंदर्भात खेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५३६/२०२५ अंतर्गत भा.द.वि. कलम १२६(२), ११५(२), ३५२, ३५१(२), आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी तेजपाल सिंग यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल राजे करीत आहेत.
पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी या प्रकरणी कठोर कारवाईचे संकेत दिले असून, अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. नागरिकांना कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.