

Ketan Murder Case
पुणे: "अवघ्या २० दिवसांत मी माझा मुलगा आणि वडील अशा दोघांनाही गमावले आहे. या धक्क्यातून आमचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे," अशा अत्यंत वेदनादायी शब्दांत केतन अग्रवालच्या वडिलांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिले आहे. या प्रकरणाचा तपास जलदगती न्यायालयात चालवून कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती त्यांनी या पत्राद्वारे राष्ट्रपतींना केली आहे.
केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी राष्ट्रपतींच्या सचिवाला पाठवलेल्या ईमेलमध्ये लिहिले आहे की, "मी कोणतीही मोठी व्यक्ती किंवा व्यावसायिक म्हणून नव्हे, तर केवळ एक पिता म्हणून आपल्याकडे न्यायाची याचना करत आहे. आम्हाला कोणतीही विशेष वागणूक नको आहे, तर केवळ वेळेत न्याय हवा आहे. आरोपींना कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी, कारण न्यायाला होणाऱ्या विलंबामुळे कुटुंबांचे दुःख अधिकच वाढत आहे."
केतनच्या हत्येनंतर अवघ्या २० दिवसांतच त्याच्या आजोबांचेही निधन झाले, याचाही उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे. "माझ्या वडिलांचे केतनवर जीवापाड प्रेम होते. नातवाच्या हत्येचा धक्का ते सहन करू शकले नाहीत आणि विरहापोटी त्यांचाही जीव गेला. अवघ्या २० दिवसांत मी माझा मुलगा आणि वडील दोघांनाही गमावले," असे विशाल अग्रवाल यांनी पत्रात नमूद केले आहे.
त्यांनी एका भावूक विनंतीसह पत्राचा समारोप केला आहे, "माझ्या मुलाची केस ही केवळ सरकारी कार्यालयातील एक फाईल बनून राहू नये, हीच विनंती. कारण या केसच्या मागे सर्वस्व गमावलेले एक कुटुंब उभे आहे."
२५ वर्षीय केतन अग्रवाल याची १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावरून ढकलून देऊन हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी केतनची होणारी पत्नी सिया गोयल (वय २०) आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी (वय २२) यांच्यावर हत्येचा आरोप आहे. नोव्हेंबर महिन्यात केतन आणि सिया यांचा विवाह होणार होता, मात्र त्यापूर्वीच हा कट रचण्यात आला. दरम्यान, पुणे न्यायालयाने या प्रकरणातील दोन्ही आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना १६ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.