

वाघोली: वाघोली-लोहगाव सीमेवरील डायमंड वॉटर पार्ककडे जाणारा रस्ता जलवाहिनी व ड्रेनेजलाइनच्या कामासाठी मागील अनेक दिवसांपासून खोदून ठेवला आहे. यामुळे वाहनचालक आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. रस्ता बंद असल्याने वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत असून, शाळा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागला.
परिसरातील माउंट सेंट पॅट्रिक स्कूल, विखे पाटील स्कूल आणि सेंट जोसेफ स्कूल सुरू झाल्याने या रस्त्यावर विद्यार्थ्यांची वर्दळ वाढली आहे. मात्र, रस्त्यावरील खड्डे, धूळ आणि अपूर्ण कामांमुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली. महापालिका प्रशासनाने तातडीने या रस्ता पूर्ववत करावा, अशी मागणी विद्यार्थी, पालक आणि नागरिकांकडून होत आहे.
नगरसेविका ऐश्वर्या पठारे म्हणाल्या की, या रस्त्याबाबत पालक तसेच नागरिकांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महापालिकेकडे तातडीने पाठपुरावा करून या रस्त्याची दुरुस्ती करून घेतली जाईल.
या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा आणि ड्रेनेज या विभागांकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. अधिकाऱ्यांसमवेत या रस्त्याची पाहणीही केली आहे. मात्र, दिरंगाईमुळे काम पूर्ण होण्यास विलंब झाला. संबंधित विभागाला तातडीने काम पूर्ण करून हा पूर्ववत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बापूसाहेब पठारे, आमदार, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ
या रस्त्यावर जलवाहिनी आणि ड्रेनेजलाइनचे काम करण्यात आले आहे. पाणीपुरवठा विभागाच्या वतीने येत्या आठवडाभरात हा रस्ता पूर्ववत करून दिला जाईल.
शुभम घाटकर, कनिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका