

कात्रज : पुढारी वृत्तसेवा : कात्रज घाटात रविवारी दुपारी दीडच्या सुमारास वणवा लागला. वन विभागाने तो आटोक्यात
आणला होता. मात्र, सायंकाळी पुन्हा वणवा भडकला. रात्री उशिरापर्यंत वन विभागाच्या कर्मचार्यांकडून वणवा नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. कात्रज घाट परिसरात दरवर्षी उन्हाळ्यात वणवा पेटण्याच्या घटना घडतात. या पार्श्वभूमीवर वन विभागाने काही अंतरावर चर खोदले आहेत. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यात यश येत असल्याचे वनरक्षक संभाजी गायकवाड यांनी सांगितले.
घाट परिसरात भिलारेवाडी वन विभागांतर्गत सुमारे 900 हेक्टर वनक्षेत्र आहे. याठिकाणी विविध जातीचे पशु-पक्षी, वनसंपदा असून, जैवविविधतेने हा भाग नटलेला आहे. मात्र, रविवारी समाजकंटकांनी या भागात वणवा लावल्याचा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे.
हरीण, रानडुक्कर, मोर आदी प्राण्यांचा अधिवास या परिसरात आहे. त्यांच्या जिवीताला या वणव्यामुळे धोका निर्माण झाला आहे. वन विभाग दरवर्षी लाखो रुपये खर्च करून नवीन वर्षाची लागवड, पशुपक्ष्यांना खाद्य आदी गोष्टी करते. मात्र, वणव्यांमुळे निसर्गसौंदर्याने नटलेल्या परिसराचे नुकसान होत असल्याने पर्यावरण आणि प्राणिमित्रांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. वनसेवक संभाजी धनावडे व वन कर्मचार्यांकडून वणवा आटोक्यात आणण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते.