

पुणे: कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण गेल्या आठ वर्षांपासून रखडलेले असून, अखेर या प्रकल्पाला गती मिळण्याची चिन्हे आहेत. 50 मीटर रुंदीकरणासाठी आवश्यक भूसंपादनासाठी महापालिकेने तब्बल 270 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यापैकी 220 कोटी रुपये विविध विभागांमधून वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करण्यात आले आहेत. स्थायी समितीच्या शुक्रवारी (दि. 12) झालेल्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. (Latest Pune News)
2017 मध्ये या रस्त्याच्या रुंदीकरणाचे भूमिपूजन झाले होते. मात्र, जागा ताब्यात नसताना प्रकल्पाचा शुभारंभ केल्याने काम सुरळीत झाले नाही. परिणामी, आठ वर्षांत 50 टक्केही काम पूर्ण झालेले नाही. या ढिसाळ कारभारामुळे रस्त्यावर वारंवार अपघात होत असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे.
भूसंपादनासाठी महापालिकेने टीडीआर व एफएसआयचा पर्याय दिला होता. पण, नागरिकांनी तो नाकारला. त्यामुळे आता रोख रकमेने भूसंपादन करावे लागत आहे. या विलंबामुळे जमिनींच्या किमती वाढल्याने महापालिकेच्या खर्चात भर पडली आहे.
गेल्या वर्षी राज्य सरकारकडून 139 कोटी रुपयांचा निधी मिळाला होता, त्यातून काही जागा ताब्यातघेण्यात आल्या.आता उर्वरित भूखंडांसाठी आयुक्त नवल किशोर राम यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत समन्वय साधून समिती स्थापन केली आहे.
84 मीटरपैकी 50 मीटर रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी अनेक भूखंड आवश्यक आहेत. एकूण 270 कोटी रुपयांची गरज आहे. यापैकी 55 कोटी रुपये भूमीप्राप्ती खात्यात आधीच आहेत. उर्वरित रक्कम मिळविण्यासाठी पथ विभागाकडून 160 कोटी तसेच प्रकल्प विभाग, शहर अभियंता व भवनरचना विभागाकडून प्रत्येकी 20 कोटी, असे वर्गीकरण करण्यात आले. या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली.
- अनिरुद्ध पावसकर, पथ विभागप्रमुख