पुणे : पुढारी वृत्तसेवा : सुबक रंगबिरंगी रांगोळ्या…विविधरंगी फुलांची आरास व गालीचे, पूजेचे लक्षवेधी साहित्य, त्रिपुरारी वात, सुंदर पारंपरिक आकर्षक दिवे व पणत्या आणि ढोल-ताशांचा गजर अशा मंगलमय वातावरणात श्रीवृध्देश्वर सिध्देश्वर मंदिर लखलखत होते. निमित्त होते पुढारी कस्तुरी क्लब आणि सुकांता शुध्द शाकाहारी भारतीय थाळी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित 'तिमिरातूनी तेजाकडे' दीपोत्सव कार्यक्रमाचे.
त्रिपुरारी पौर्णिमेचे पौराणिक काळातील महत्त्व अधोरेखित आणि संस्कृतीचे जतन करीत त्रिपुरारी वात प्रज्वलित करून पुढारी कस्तुरी क्लबच्या अध्यक्षा डॉ. सौ. स्मितादेवी योगेश जाधव यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने श्रीसुक्त पठणाची सुरुवात केली. त्यांच्यासह कार्यक्रमस्थळी जमलेल्या कस्तुरी विभागप्रमुख आणि असंख्य सभासद महिलांच्या श्रीसुक्त पठणाने आसमंत दुमदुमून गेला.
कस्तुरी क्लब अध्यक्षा डॉ. सौ. स्मितादेवी योगेश जाधव यांचे आगमन होताच खास नऊवारी साडी परिधान केलेल्या व मराठमोठा पारंपरिक साजशृंगार केलेल्या कस्तुरींनी फुलांचा वर्षाव करीत त्यांचे औक्षण केले. त्यानंतर श्री वृध्देश्वर-सिध्देश्वराची विधिवत आरती करण्यात आली. कार्यक्रमासाठी सुकांता शुध्द शाकाहारी भारतीय थाळीचे सहकार्य खूप मोलाचे ठरले. समर्थ प्रतिष्ठानचे संजय सातपुते यांच्या अध्यक्षतेखालील ढोल-ताशांच्या पथकाने सुंदर सादरीकरण करत कार्यक्रमात रंगत आणली. श्रीवृध्देश्वर सिध्देश्वर देवस्थान ट्रस्टने सर्वांसाठी चहापानाची व्यवस्था केली होती.
त्रिपुरारी पौर्णिमा दीपोत्सवानिमित्त पुढारी कस्तुरी क्लबसोबत कार्यक्रमात सहभागी होताना विशेष आनंद झाला. नियोजनबध्द कार्यक्रम केल्याबद्दल कस्तुरींचे विशेष कौतुक वाटते.
– उपेश मर्लेचा, सुकांता शुद्ध शाकाहारी भारतीय थाळी.
कस्तुरी क्लबसोबत या वर्षी पुन्हा दीपोत्सव साजरा करीत आहोत. यामध्ये सर्वांचा अतिशय सुंदर सहभाग पाहायला मिळतो. त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक! यापुढेही असेच कार्यक्रम त्यांच्या सोबत करण्यास आम्हाला नक्कीच आवडेल.
– हनुमंत बहिरट पाटील, अध्यक्ष व सुधीर दुर्गे, सचिव,
श्रीवृध्देश्वर सिध्देश्वर देवस्थान ट्रस्ट, शिवाजीनगर, पुणे.
हेही वाचा