

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कसब्यातील जुने वाडे व इमारतींचा विकास थांबला आहे. हा विकास होण्यासाठी या ठिकाणी टीपी स्कीमची गरज आहे. त्यानंतरच विकासासह हेरिटेज वास्तूंचेही जतन होणार. कसब्यातील हे प्रश्न तातडीने सोडवण्याचे काम राज्य सरकार करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचाराची सांगता शुक्रवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रचार रॅलीने झाली. फुले वाड्यातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सुरू झालेल्या रॅलीचा समारोप कसबा गणपती मंदिरासमोर जाहीर सभेने झाला. या वेळी शिंदे बोलत होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, हेमंत रासने, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री दादा भुसे, उदय सामंत, प्रवीण दरेकर, खासदार श्रीरंग बारणे, हेमंत रासने, शैलेश टिळक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आमचे सरकार सर्वसामान्यांचे आहे. नागरिकांना देणारे आहे, त्यांच्याकडून घेणारे नाही. शहरातील मेट्रो, विमानतळ, रिंगरोड हे प्रकल्प लवकर मार्गी लावले जातील. चांदणी चौकातील वाहतूक कोंडी आम्ही सोडवली आहे. आता शहरातील आणि कात्रज चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. कसबा मतदारसंघात जी कामे करायची आहेत, ती करण्याची जबाबदारी सरकारची आहे. ते काम सरकार करेल. गणेश मंडळावरील निर्बंध पूर्णपणे काढून मंडळांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. तसेच सर्व सण उत्साहात व जल्लोषात साजरे होतील, याची हमीही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
उद्धव ठाकरेंना टोला
आमचे जुने नेते सत्ता गेल्यावर सुधारतील असे वाटत होते. मात्र, ते सुधारण्याचे नाव घेत नाही. पोटनिवडणुकीसाठी त्यांनी ऑनलाइन पद्धतीने भाषण केले. कदाचित त्यांना कोणीतरी सांगितले असेल आपला उमेदवार पडणार आहे. त्यामुळे ते आले नसतील, असे म्हणत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंनाही टोला लगावला.
मोदींना हरवणारा जन्मला नाही
मोदींना हरविण्यासाठी बाहेर गेलेले व मेलेले लोक मतदानासाठी आणा म्हणतात. मात्र, मोदींना हरविणारा अजून जन्मलेला नाही, असेही शिंदे म्हणाले. गहान ठेवलेला धनुष्यबाण सोडवला आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन राज्यात युतीचे सरकार स्थापन केले आहे. धनुष्यबाण चोरला असे म्हणणार्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे तो गहाण ठेवला होता. आम्ही तो सोडवला आहे.
'पन्नास खोके एकदम ओके'च्या घोषणा
मुख्यमंत्री शिंदे यांची रॅली सुरू असताना त्यांना 'आले रे आले, गद्दार आले, पन्नास खोके एकदम ओके' अशा घोषणांचा सामना करावा लागला. रॅली मोमीनपुरा परिसरात आल्यानंतर राष्ट्रवादीचा झेंडा घेतलेल्या तीन मुलींनी या घोषणा दिल्या. त्यामुळे गोंधळ उडाला. पोलिसांनी तत्काळ या मुलींना ताब्यात घेतले.
रिझल्टला महत्त्व आहे
मी जे बोलतो ते करून दाखवतो. लोकसेवा आयोग काय आणि निवडणूक आयोग काय, रिझल्टला महत्त्व आहे. मी चुकीचे बोलत नाही, त्यामुळे माझ्यावर कृष्णेकाठी जाऊन आत्मक्लेश करण्याची वेळ माझ्यावर कधी आलेली नाही. शेतकरी पाणी मागतो तेव्हा त्यांना धरण दाखवले जाते, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना टोला लगावला.