

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणार्या कसबा पेठ मतदारसंघात महाविकास आघाडीने तुल्यबळ उमेदवार उभा केल्याने पोटनिवडणुकीत चुरस वाढली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेनेचे (ठाकरे गट) युवानेते आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक नेते या अटीतटीच्या लढतीत प्रचारासाठी सहभागी झाले.
पुणे जिल्ह्यातील चिंचवड आणि कसबा पेठ या मतदारसंघातील भाजप आमदारांचे निधन झाल्याने दोन्ही ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर झाली. कसबा पेठेत भाजपमध्ये उमेदवार निवडीवरून सुरुवातीला वाद रंगला. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी देण्यात आली नाही. भाजपने स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. त्याचवेळी महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसने माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली. धंगेकर यांनी दोनवेळा निवडणूक लढविली होती. तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते मागे उभे राहिल्याने ही थेट लढत चुरशीची झाली.
विधान परिषदेच्या निवडणुकीत मविआला यश मिळाल्याने, या आघाडीने पुण्यातील दोन्ही निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या. नाना पटोले यांनी कसबा पेठ मतदारसंघात ठाण मांडून प्रचाराची रणनिती आखली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण असे तीन माजी मुख्यमंत्री सहभागी झाले. त्यामुळे पहिल्या दिवसांपासूनच राजकीय वातावरण तापले.
भाजपचा बालेकिल्ला राखण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष घातले. चार-पाच वेळा ते मतदारसंघांत आले.
त्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संपूर्ण प्रचारयंत्रणेवर लक्ष दिले. मुख्यमंत्री शिंदे यांनी काही मेळावे घेतले, तसेच प्रचाराच्या समारोपाला ते येणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रचाराला आले नसले, तरी ते महाशिवरात्रीला मतदारसंघातील मंदिरात पूजेसाठी आले होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, पंकजा मुंडे, मंगलप्रसाद लोढा यांच्यासह अनेकजण प्रचारासाठी काही दिवस आले होते.
काँग्रेसच्या उमेदवाराला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येताच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी त्यांच्यामागे ताकद उभी केली. रॅली, प्रचारसभा घेत त्यांनी कार्यकर्ते कामाला लावले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी (ता. 22) मतदारसंघात तीन मेळावे घेतले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, सुनील केदार, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे, विद्या चव्हाण यांनीही मेळावे व सभा घेतल्या. शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) युवानेते आदित्य ठाकरे गुरुवारी (ता. 23) प्रचारफेरीत सहभागी होत जाहीर सभा घेणार आहेत.
प्रचार शिगेला
तिन्ही पक्षांचे नेते मैदानात उतरल्याने त्यांचा प्रचार भाजपच्या तोडीस तोड झाला. या नेत्यांव्यतिरिक्त अनेक आमदार, शहराच्या अन्य भागातील स्थानिक नेते, माजी नगरसेवक यांनी मतदारसंघातच ठिय्या मारल्याने, गेले दोन आठवडे निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे.