

पारगाव; पुढारी वृत्तसेवा : पारगाव परिसरात सध्या कांदालागवडी जोरात सुरू आहेत. परंतु, मजूर टंचाईमुळे कांदालागवडीची कामे खोळंबली आहेत. कांदालागवड करणार्या महिलांनी मजुरीचे दर वाढविल्याने शेतकर्यांपुढे नवीन समस्या उभी राहिली आहे.
तालुक्याच्या पूर्वभागात उन्हाळी कांद्याचीलागवड मोठ्या प्रमाणावर शेतकरी करतात. सध्या पारगाव, काठापूर, शिंगवे, रांजणी वळती, नागापूर, थोरांदळे या गावांमध्ये कांदालागवडींची कामे वेगात सुरू आहेत.
परंतु, आता कांदालागवडी या मजुरांच्या टंचाईमुळे खोळंबल्या आहेत. या परिसरात एका वेळेस सर्वत्र लागवडी सुरू असल्याने मजूर टंचाई निर्माण झाली आहे. मजुरांची अक्षरश: शेतकर्यांकडून पळवापळवी सुरू आहे. लागवडीची कामे उरकून जाण्यासाठी शेतकर्यांना महिला मजुरांच्या अक्षरश: पाया पडण्याची वेळ आली आहे. मागील आठवड्यात या परिसरात तीनशे रुपये महिला मजुरांना हजेरी द्यावी लागत होती. परंतु, आता एका महिलेला एका दिवसाची हजेरी 350 रुपये द्यावी लागत आहे, असे पारगाव येथील शेतकरी सांगत आहेत.
कांदालागवडीसाठी निर्माण झालेली मजूर टंचाई, महिला मजुरांनी वाढवलेले मजुरीचे दर यामुळे अडचण निर्माण झाली आहे. कांदा पिकासाठी मोठे भांडवल गुंतवूनही कांद्याला बाजारभावाची चांगली साथ मिळत नाही. यामुळे वर्षानुवर्ष कांदा पीक हे आम्हा शेतकर्यांसाठी आता अडचणीचेच ठरत आहे. या पिकातून पैसे न मिळता उलट भांडवल अंगावर येऊन कर्जबाजारी व्हावे लागत आहे.
– सुगंध पोंदे, कांदा उत्पादक