

कडूस: खेड तालुक्याच्या पश्चिम भागांत विशेषतः भिमनेर आणि भामनेर खोऱ्यात परतीच्या पावसाने शनिवार (दि. २७) संध्याकाळपासून धुवाधार बँटिंग केल्याने चासकमान धरण आणि भामा-आसखेड धरणात पाण्याची आवक वाढली आहे.
खबरदारीचा उपाय व संभाव्य पावसाची शक्यता गृहित धरून चासकमान धरणा मधून भिमा नदीपात्रात २० हजार ३१० क्युसेकने विसर्ग करण्यात आला आहे, तर भामा-आसखेड धरणामधून भामा नदी पात्रात एकूण १३ हजार ३१२ क्युसेकने विसर्ग करण्यात आला आहे. (Latest Pune News)
चासकमान धरणामधून मोठा विसर्ग करण्यात आल्याने चास-कङूस-टोकेवाडी दरम्यानचा पुल पाण्याखाली गेला आहे. तर भामा आसखेड धरणामधून विसर्ग केल्याने धामणे-करंजविहिरे दरम्यानचा पुल पाण्याखाली गेल्याने संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. नदीकाठच्या गावांच्या स्मशानभुमीना पाण्यानी वेढा घातला आहे. मोठा विसर्ग केल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पश्चिम भागांत थोडीशी उघडीप वगळता धरणांच्या पाणलोट क्षेत्रांत सतत पावसाची संतधार सुरू असून पावसाने परिसरातील ओढे-नाले दुथडी भरून वाहू लागले आहे. यामुळे चासकमान, भामाआसखेड, कळमोडी, धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.परिसरातील प्रमुख ओढ्या-नाल्यांनी इशारा धोक्याची पातळी ओलांडली असून पावसाची वाटचाल संयमी असल्याने प्रमुख नद्यांनी पूररेषा ओलांडण्याची तयारी केलेली आहे.