रोहयोची कमाल ! जिल्ह्यात 6 हजार 157 मजूरांना रोजगार

रोहयोची कमाल ! जिल्ह्यात 6 हजार 157 मजूरांना रोजगार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दुष्काळी स्थितीत मजुरांच्या हाताला रोजगार मिळावा, यासाठी सुरू करण्यात आलेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेला पुणे जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. पुणे जिल्ह्यात या योजनेंतर्गत विविध प्रकारांतील 1 हजार
162 कामे सुरू असून, त्यावर सहा हजार 157 मजूर काम करीत आहेत. पुणे जिल्ह्यातील क्षेत्र ओलिताखाली असल्याने या परिसरात संपन्नता आहे. तसेच ओद्योगिक वसाहतींची संख्या अधिक असून. तिथे कामगारांना रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे मनरेगाच्या कामासाठी मजूर मिळत नसल्याचे चित्र होते. मात्र, यंदा जिल्ह्यातील ग्रामीण भागात दुष्काळी स्थिती असल्याने मजूर रोजगार हमीच्या कामांकडे वळत असल्याचे दिसून येत आहे.

रोजगार हमी विभागाच्या वतीने जिल्ह्यात वर्षभर केल्या जाणार्‍या कामांचे नियोजन केले जाते. सध्या 10 हजार 470 कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यात घरकुल, फळबाग, विहीर, गोठा यांसह 263 प्रकारची कामे प्रस्तावित आहेत. जिल्ह्यात सध्या वैयक्तिक आणि सार्वजनिक प्रकारातील 1 हजार 162 कामे सुरू आहेत. यात वैयक्तिक कामे अधिक असून, सार्वजनिक कामांवर काम करणार्‍या मजुरांना प्रतिदिवस 273 रुपये मोबदला दिला जातो. खासगी क्षेत्राच्या तुलनेत हा मोबदला कमी असल्याने मजुरांची पहिली पसंती खासगी क्षेत्राला मिळत असल्याचे दिसून येते.

जिल्ह्यात 1 लाख 1 हजार 393 मजुरांची नोंदणी केली असून, त्यांच्याकडे जॉब कार्ड आहे. मजुरांनी ग्रामपंचायतींकडे कामाची मागणी केल्यास काम उपलब्ध करून दिले जाते. मनरेगाअंतर्गत वैयक्तिक आणि सार्वजनिक प्रकारची कामे मंजूर आहेत. नागरिकांनी मनरेगाअंतर्गत वैयक्तिक कामाचा लाभ घ्यावा.

– डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील, उपजिल्हाधिकारी, रोजगार हमी, पुणे

जिल्हा प्रशासनाची लक्ष्यपूर्ती

जिल्हा प्रशासनाला शासनाकडून मनुष्य दिन उद्दिष्ट दिले जाते. पुणे जिल्ह्याला चालू आर्थिक वर्षात 4 लाख 27 हजार मनुष्य दिन उद्दिष्ट होते. परंतु, सध्याची दुष्काळी स्थिती पाहता कामांची मागणी वाढली असून, आतापर्यंत 5 लाख 8 हजार 882 दिवस काम दिले आहे.

667 विहिरींना मंजुरी

पुणे जिल्ह्यात रोजगार हमी योजनेंतर्गत संचित विहिरींना मागणी आहे. प्रशासनाकडून 667 विहिरींना मंजुरी देण्यात आली असून, त्यातील 268 विहिरींचे काम सुरू झाले आहे. प्रत्येक विहिरीला चार लाख रुपयांचे अनुदान दिले जाते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news