

पुणे : कल्याणीनगरमध्ये रात्रीच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत एका अल्पवयीन मुलाने पोर्शे कार चालवून दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत तरुण- तरुणीचा मृत्यू झाला होता. या हायप्रोफाइल प्रकरणात ससून रुग्णालयात अल्पवयीन मुलाचे रक्तनमुने बदलण्यात सहभागी असलेला मुख्य आरोपी बिल्डर विशाल संजय अगरवाल याने आपल्या आजारी आईच्या देखभालीसाठी 21 दिवसांच्या तात्पुरत्या जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, पुणे सत्र न्यायालयातील विशेष न्यायाधीश के. पी. क्षीरसागर यांनी हा अर्ज फेटाळला. (Pune News Update)
विशाल अगरवालने जामीन अर्जात नमूद केल्याप्रमाणे, त्याच्या आईला स्पाईन शस्त्रक्रियेची गरज असून, ती उच्च धोका असलेल्या सर्जरींपैकी एक मानली जाते. तसेच, त्याची पत्नी शिवानी अगरवाल हिला आधीच मानसिक अस्वस्थतेच्या कारणामुळे तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे सर्जरीपूर्वी आणि नंतर आईची देखभाल करण्यासाठी विशाल अगरवालची उपस्थिती आवश्यक असल्याचा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी न्यायालयात केला.
मात्र, विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी या अर्जाला तीव— विरोध केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपीच्या आईचा आजार हा वयजन्य असून, ती सध्या गंभीर अवस्थेत नाही. ही शस्त्रक्रिया आधीपासून नियोजित असल्यामुळे ती आपत्कालीन परिस्थिती मानता येत नाही. शिवाय, आरोपीच्या कुटुंबात वडील, बहीण, मुलगा, मेहुणा आणि पत्नी अशी इतर मंडळी आहेत. त्यामुळे आईच्या देखभालीसाठी विशाल अगरवालची गरज भासत नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला.
न्यायालयाने नमूद केले की, या प्रकरणात पीडितांचे आणि आरोपीचे हक्क यामध्ये संतुलन राखणे आवश्यक आहे. सध्या विशाल अगरवाल याला जामिनावर सोडणे योग्य नसल्याचे स्पष्ट करत, त्याचा तात्पुरता जामीन अर्ज फेटाळला.