Kalas Dhanori Lohegaon Ward: कळस-धानोरी-लोहगाव प्रभागात खुली जागा एक, इच्छुक मात्र अनेक
Kalas Dhanori Lohegaon Ward Pune Politics
प्रभाग क्रमांक : 1
कळस-धानोरी-लोहगाव उर्वरित महापालिकेची अंतिम प्रभागरचना जाहीर झाली आहे. महापालिकेच्या प्रभाग क्र. 1 चा मानकरी ठरलेल्या कळस-धानोरी या प्रभागात कळस, विश्रांतवाडीचा काही भाग, धानोरी व लोहगाव या प्रमुख भागांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवडच्या बोपखेलजवळील गणेशनगरपासून वडगाव शिंदे व वाघोली या गावांच्या सीमेपर्यंत हा प्रभाग पसरलेला आहे. हे अंतर सुमारे बारा ते पंधरा किलोमीटर असल्याने मतदारांपर्यंत पोहचताना उमेदवारांची चांगलीच दमछाक होणार आहे.(Latest Pune News)
प्रभागाची एकूण लोकसंख्या 92 हजार 644 इतकी असून, त्यात धानोरीचा वाटा सुमारे 42 हजार इतका असल्याने तिकीट वाटपात धानोरीचा वरचष्मा राहू शकतो. अजून तरी महायुती-महाआघाडी होणार का, ठाकरे गट एकत्र येणार का, याबाबत संदिग्धता आहे. मात्र, सर्वच पक्षांतील इच्छुकांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, तीर्थयात्रा यांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्यास सुरुवात केली आहे.
या प्रभागातील मुख्य सामना हा महायुतीमधील घटकपक्षांतच, म्हणजेच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातच होणार असल्याचे स्पष्ट आहे. गत निवडणुकीत भाजपने तीन, तर राष्ट्रवादीने एक जागा जिंकली होती. आता राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत रंगणार आहे. या प्रभागाचे वैशिष्ट्य म्हणजे एका प्रभागात एससी, एसटी, ओबीसी, अशी तीन आरक्षणे पडतात, त्यामुळे खुल्या वर्गासाठी एकच जागा असणार आहे, त्यामुळे इच्छुकांची मोठी अडचण होते.
या प्रभागात भाजपकडून माजी नगरसेवक अनिल टिंगरे हेच प्रमुख दावेदार आहेत. हॅट्ट्रिकच्या तयारीत असलेल्या टिंगरे यांना स्वपक्षातून स्पर्धक नसला, तरी त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे शशिकांत टिंगरे शड्डू ठोकणार आहेत. तसेच, माजी नगरसेवक सतीश म्हस्के व लोहगावचे माजी उपसरपंच नवनाथ मोझे, डॉ. राजेश साठे हेसुद्धा राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत. हवेली पंचायत समितीचे माजी सभापती अशोक खांदवे आणि अनिल टिंगरे यांचे बंधू विशाल टिंगरे यांचीही नावे चर्चेत आहेत.
महिला मागासवर्ग गटातून हॅट्ट्रिक साधलेल्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे कोणत्या चिन्हावर निवडणूक लढणार? पुन्हा पक्ष बदलणार का? विधानसभा निवडणुकीपूर्वी वारंवार केलेल्या पक्षांतराचा त्यांना फटका बसणार का? हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे. या वेळी ताईंना आधी तिकिटाची लढाई जिंकून मगच निवडणुकीच्या मैदानात उतरावे लागणार, असे चित्र दिसत असले; तरी अनुभवाच्या जोरावर रेखाताई विरोधकांना धोबीपछाड देणार का? हे पाहणे रंजक ठरणार आहे. महिला आरक्षित जागेतून भाजपच्या वंदना संतोष खांदवे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. याशिवाय सुनीता संदीप मोझे ह्यासुद्धा इच्छुक आहेत.
त्याचबरोबर थेट ‘छत्रपती संभाजीराजे यांचा आशीर्वाद घेत लढायचं आणि जिंकायचंच’ अशी गर्जना करीत पूजा जाधव यांनी जंगी सांस्कृतिक कार्यक्रमांची राळ उडवून देत भाजपच्या तिकिटासाठी दावा ठोकला आहे. धानोरीतील मोनिका परांडे, कळसमधील पूनम म्हस्के आणि यशोदा केसरकर यांनीही जनसंपर्क वाढविल्याने प्रभागात चांगलाच ट्विस्ट निर्माण झाला आहे; तर राष्ट्रवादीकडून माजी नगरसेवक सतीश म्हस्के यांच्या पत्नी मीनाक्षी म्हस्के राष्ट्रवादीच्या उमेदवार असू शकतात. तिकीट वाटपात दगाफटका झाल्यास एखादा प्रमुख इच्छुक पती-पत्नी असे जोडीने मैदानात उतरून सर्व राजकीय समीकरणे बिघडवू शकतात. भाजपकडून माजी नगरसेविका ऐश्वर्या जाधव अनुसूचित जाती प्रवर्गातून इच्छुक आहेत.
पुरुषांमध्ये राष्ट्रवादीकडून सुशांत माने, संजय चव्हाण; तर भाजपकडून रावसाहेब राखपसरे, जितेंद्र जगताप, लिंगू साखरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून केशव राखपसरे हे इच्छुक आहेत. यातील बहुतेक जण आपल्या पत्नीसाठी तिकीट घ्यायला तयार आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून धानोरीतील शांताराम खलसे अनुसूचित जाती, तर विश्रांतवाडीतून शशिकांत साटोटे नागरिकांचा मागासवर्ग या गटातून इच्छुक आहेत. मनसेकडून गणेश पाटील नागरिकांचा मागासवर्ग किंवा सर्वसाधारण गटातून इच्छुक आहेत. रिपब्लिकन, बहुजन समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी तसेच इतर पक्षांच्या उमेदवारांचीही जुळवाजुळव सुरू आहे. युती, आघाडी झाल्यास किंवा आरक्षणात बदल झाल्यास मोठे फेरबदल होऊ शकतात. अर्थातच, हा ‘जर-तर’चा खेळ आहे.
या प्रभागात अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण आहे. या जागेसाठी भाजपकडून माजी नगरसेवक नाना सांगडे हे इच्छुक असल्याचे सांगण्यात येत असले, तरी अद्याप ते तयारीत दिसत नाहीत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून संदीप दांगट व संगीता दांगट हे इच्छुक आहेत.
आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
विधानसभेनंतर महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे, माजी आमदार जगदीश मुळीक व सुनील टिंगरे प्रथमच समोरासमोर येणार आहेत. राष्ट्रवादीच्या उमेदवारांना ताकद देऊन विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्याची नामी संधी सुनील टिंगरे यांच्याकडे आयती चालून आली आहे. तुतारीचे उमेदवार निवडून आणल्यास बापूसाहेब पठारेंचे पक्षातील वजन वाढू शकते, तर जगदीश मुळीकांना विधानपरिषदेचा दरवाजा खुला होऊ शकतो. त्यामुळे मतदारसंघात प्रचारानिमित्त चांगली जुगलबंदी पाहायला मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
...तर तुतारीची हवा होणार गुल
भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्यास काही जण शरद पवारांची तुतारी वाजविण्याच्या तयारीत आहेत. मात्र, ऐनवेळी आमदार पुत्रांनीच तुतारी वाजविण्यास नकार दिल्यास शरद पवार गटातील इच्छुकांची गोची होऊन मतदारसंघातील गणिते बदलू शकतात. या प्रभागातील काही भाग आंबेडकरी विचारांचा, काही वर्षानुवर्षे राष्ट्रवादीच्या मागे उभा राहणारा, तर काही भाजपकडे झुकणारा आहे, अशी अटकळ बांधून प्रचाराचे नियोजन सुरू आहे.

