

संतोष निंबाळकर
सोसायट्या, झोपडपट्ट्या, गावठाण आणि वस्ती भाग, असा संमिश्र नागरी वर्ग असलेल्या प्रभाग क्र. 1 मध्ये वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या समस्या आहेत. धानोरी मुख्य नाल्यावर ठिकठिकाणी झालेले पूल, महिलांच्या डोक्यावरून उतरलेला पाण्याचा हंडा, ठिकठिकाणी असलेली उद्याने, महापालिकेच्या जुन्या हद्दीत गल्लोगल्ली झालेले रस्ते, यामुळे वरकरणी जरी सर्व आलबेल आहे, असे वाटत असले, तरी अजूनही कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, नाल्यांना आलेले गटाराचे स्वरूप, रस्त्यावरील खड्डे, वेळेत दुरुस्ती न होणारे सांडपाणी वाहिन्यांचे चेंबर, नित्याची झालेली वाहतूक कोंडी, यामुळे नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे पाहायला मिळते.(Latest Pune News)
धानोरी व लोहगावमध्ये पूरस्थितीमुळे नागरिकांच्या वाहनांचे व मालमत्तेचे दरवर्षी लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेले लोहगावकर आठ वर्षांनंतरही रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, पथदिवे आदी मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत आहेत. धानोरी जकात नाका ते लोहगाव बसस्टॉप, गावठाणचा काही भाग, साठेवस्ती, पोरवाल रोड, असा बहुतांश परिसर आठ वर्षांपूर्वी महापालिकेत समाविष्ट होऊन हा भाग विकासापासून वंचित आहे. रस्ते, पाणी, ड्रेनेज, विद्युतपुरवठा अशा मूलभूत नागरी प्रश्नांचा या भागातील नागरिकांना सामना करावा लागत आहे. पिण्याच्या व इतर वापराच्या पाण्यासाठी शंभर सदनिकांच्या इमारतीला महिन्याला दोन लाखांच्या वर खर्च येतो. गटार तुंबले तरी नागरिकांना आमदारांकडे जावे लागते, अशी लोहगावची बिकट परिस्थिती आहे. त्यामुळे या भागात प्रचाराचा हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे.
विश्रांतवाडी-आळंदी रस्त्यावरील शेकडो अतिक्रमणे का हटविली जात नाहीत, धानोरीतील गोकूळनगर येथे अनधिकृत भाजी मंडई राजरोसपणे कशी चालू आहे, जिल्हा प्रशासनाच्या ताब्यातील ही जागा महापालिकेच्या ताब्यात का घेतली जात नाही, वाहतूक कोंडी का सुटत नाही, डीपी रस्ते का रखडले आहेत, नाल्यातून सांडपाणी का वाहते, नाले कसे आक्रसतात किंवा वळविले जातात, विश्रांतवाडी चौक, धानोरी गावठाण, पोरवाल रस्ता चौक येथील जीवघेण्या कोंडीतून सर्वसामान्यांची सुटका कधी होणार आदी प्रश्नांची उत्तरे माननीयांना प्रभागातील मतदारांना नक्कीच द्यावी लागणार आहेत.
विश्रांतवाडी-धानोरी डीपी रस्त्यातील बाधितांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही
विश्रांतवाडी मुख्य रस्ता व गोकूळनगर येथील अनधिकृत भाजीमंडई व पथारी व्यावसायिक
विश्रांतवाडी चौक, धानोरी रस्त्यावरील वाहतूक कोंडी
धानोरीतील अर्धवट डीपी रस्ते
धानोरी, लोहगावमध्ये पावसाळ्यात निर्माण होणारी पूरस्थिती
सार्वजनिक अस्वच्छता, रस्त्यावर कचऱ्याचे ढीग
प्रभागातएकही बसडेपो नाही
सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव
धानोरी परिसरात सुसज्ज दवाखान्याचा अभाव
कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा
कळस येथील वापरात नसलेले ओटा मार्केट
प्रभागात झालेली प्रमुख कामे
विश्रांतवाडी चौकात सुरू असलेले उड्डाणपूल व ग्रेडसेपरेटरचे काम
धानोरी परिसरात आठ उद्याने
लोहगाव वगळता प्रभागातील बहुतेक अंतर्गत रस्ते झाले आहेत
दररोज होणारा पाणीपुरवठा
लोहगाव परिसरात मूलभूत सुविधाच उपलब्ध नाहीत
प्रभागात सुसज्ज इमारतीत भरणाऱ्या महापालिकेच्या शाळा
धानोरीत जलतरण तलाव व बॅडमिंटन हॉलची सुविधा
धानोरी नाल्यावर ठिकठिकाणी पूल व कल्व्हर्ट
धानोरीतील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे काम अंतिम टप्प्यात
भामा-आसखेड पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला. सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी प्रभागात अनेक ठिकाणी पाण्याच्या टाक्यांची कामे केली. नाला स्वच्छ करण्यासाठी एसटीपी प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून दिली. पुण्यातील दुसरी इंग््राजी माध्यमाची सीबीएसई शाळा सुरू केली. धानोरीतील वन उद्यानाचा विकास, जलतरण तलाव, बॅडमिंटन हॉलची कामे केली. भविष्यात अद्ययावत रुग्णालय व स्पोर्ट्सकॉम्प्लेक्स करण्याचा मानस असून, डीपी रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावणार आहे.
अनिल टिंगरे, माजी नगरसेवक
धानोरी सिमेंट रस्ता, अंतर्गत रस्ते, डीपी रस्ते, अनेक उद्याने यांची कामे केली आहेत. पूरस्थिती टाळण्यासाठी पावसाळी वाहिन्या टाकल्या आहेत. सुसज्ज इनडोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे काम अंतिम टप्प्यात आहे. ॲमिनिटी स्पेस उपलब्ध झाल्यास धानोरीत सुसज्ज दवाखाना बांधण्याचे नियोजन असून, पुढील कार्यकाळात डीपी रस्त्याचे काम पूर्ण करणार आहे. ख्रिश्चन व मुस्लिम समाजाच्या दफनभूमीसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.
रेखा टिंगरे, माजी नगरसेविका
मी 2019 च्या पोटनिवडणुकीत निवडून आल्याने कमी कालावधीतही अनेक कामे केली आहेत. प्रभागातील स्मशानभूमींसाठी सुमारे एक कोटींचा निधी आणला. कळस येथील दवाखाना चालू केला. लवकरच तिथे प्रसूतिगृह चालू होणार आहे. कळस येथील पाण्याच्या टाकीसाठी पाठपुरावा केला. समान पाणीपुरवठ्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
ऐश्वर्या जाधव, माजी नगरसेविका