

Crime increase in Daund region
उमेश कुलकर्णी
दौंड: भर महामार्गावर पंढरपूर यात्रेला जात असलेल्या यात्रेकरूंना लुटणे आणि त्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याच्या घटनेने दौंड शहर पोलीसांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पोलिसांना गुन्हेगार सापडत नाहीत अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे.
दौंड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये खून, जबरी चोर्या, लुटमार, बलात्कार, अवैध धंदे, गांजा, नशिल्या पदार्थांची विक्री, दुचाकी चोरी, या घटनांमध्ये वाढ झाली आहे परंतु पोलीस सुस्त पडून आहेत, त्यांना गुन्हेगार का सापडत नाही हे मात्र गुलदस्त्यातच आहे. पोलीस योग्य प्रकारे तपास करत नाही असाही प्रश्न पडत आहे. (Latest Pune News)
मागील आठवड्यात गिरीम येथे खुनाची घटना घडली परंतु अद्यापही पोलिसांना आरोपी सापडला नाही. गिरीम गावातच दोन गटांमध्ये हाणामारी झाली दोन्ही गटांतील लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आरोपी माहीत असून देखील पोलिसांनी त्यांना अटक केलेली नाही याची मात्र सर्वत्र चर्चा होत आहे.
गिरीम येथीलच एका प्रकरणात आरोपी एका खासगी दवाखान्यात उपचार घेत होता त्यावेळेस तेथे या आरोपीवर नजर ठेवण्याकरता दौंड पोलिसांनी एक कर्मचारी नियुक्त केला होता त्याच्या समक्ष आरोपी पळून गेला आहे.
या बाबत अधिक माहिती पोलिसांना विचारली असता पोलीस म्हणतात त्या आरोपीला आम्ही अटक केलीच नव्हती म्हणजे यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा या प्रकरणामध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा गावात आहे.पोलिसांच्या म्हणण्यानुसार जर आरोपी जखमी अवस्थेत उपचार घेत होता व तेथे त्यांचा कर्मचारी होता मग तुम्ही अटक न करताच पोलीस कशाला ठेवला होता, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
मागील पंधरा दिवसापूर्वी दौंड पोलिसांनी एका महिलेकडून एक किलो 11 ग्रॅम गांजा जप्त केला होता त्याची किंमत फक्त पंधरा हजार रुपये दाखवली आहे. या गांजा प्रकरणात या महिलेला दुसर्याच दिवशी जामीन झाला. वास्तविक पाहता अशा प्रकरणात लवकर जामीन होत नाही. यामध्ये देखील मोठी आर्थिक तडजोड झाल्याची चर्चा दौंड शहरात आहे.
जून महिन्यात तीन ते चार वेळा गोमांसाची विक्री करणार्यांना पोलिसांनी पकडले परंतु या प्रकरणामध्ये पोलिसांनी कारवाई जरी केली असली तरी गोमांस विक्री करणार्या आरोपींना कायद्याचा धाक राहिलेला नाही असे म्हटले तर वावगे ठरणार नाही कारण तेच ते आरोपी पुन्हा पुन्हा गुन्हा करत आहेत.
दौंड पोलिसांनी शहरातील काही गुंडांवर तडीपार करण्याबाबत यापुर्वीच्या पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव पाठवला असल्याचे सांगितले परंतु या प्रस्तावावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.दौंड शहरात तसेच पोलीस ठाण्याच्या ग्रामीण हद्दीमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. पोलीस म्हणावी तशी दखल घेत नाहीत. पोलिसांना राजकीय दबाव खाली काम करावे लागते का? असा सवाल नागरिक करू लागले आहेत.
येणार्या काळात निवडणुका आहेत त्यावेळेस देखील गटातटामध्ये मोठे वाद होऊ शकतात किंवा मोठ्या हाणामार्या होऊ शकतात त्यामुळे पोलिसांनी दौंड शहरातील गुंडांची वेळी दखल घेणे गरजेचे आहे. दखल घेतली नाही तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. नंतर कारवाई करून काही उपयोग होणार नाही त्यामुळे पोलिसांनी आत्ताच शहराचे कायदा व व्यवस्थापक बिघडवणार्या गुंडाचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.
दौंड शहरात महिला असुरक्षित आहेत अनेक छेडछाडीचे प्रकार घडतात काही महिला तक्रार देतात तर काही आपल्या इज्जतीला घाबरून तक्रार देत नाहीत. शहरात मोठ्या प्रमाणात ’ट्रिपल सीट’ दुचाकी वर ’रोड रोमिओ’ बिंदासपणे फिरत असतात,त्यांच्यावर कारवाई का होत नाही असा सवाल पडत आहे. महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
दौंड शहरातील महत्त्वाच्या ठिकाणावर रेल्वे हद्द, भीमा नदीचा दशक्रिया विधी घाट, बंगला साईड एरिया, डिफेन्स कॉलनी एरिया , दौंड रेल्वे स्थानकालगत असलेल्या दोन्ही मोठ्या ब्रिज जवळ तळीराम खुलेआम पणे रस्त्यावर दारू पीत बसलेले असतात, हे पोलिसांना माहिती आहे.
या बाबतीत पोलिसांना माहिती देखील दिलेली आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी कारवाईचे आदेश दिले होते परंतु त्यांचे बदली झाल्याने हे प्रकरण बारगळले आहे.नव्याने नियुक्त झालेले पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल्ल हे तरी अशा प्रकरणात लक्ष घालणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.