

पुणे : पुढारी वृत्तसेवा : एकमेकांकडे पाहण्यावरुन झालेल्या वादातून टोळक्याने अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार केल्याची घटना कर्वेनगर भागात घडली. यावेळी खांद्यावरील कोयत्याचा वार हातावर झेलल्याने एकाची करंगळी तुटली.
या प्रकरणी चिक्क्या जगताप (रा. कर्वेनगर) याच्यासह साथीदारां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोळक्याने केलेल्या मारहाणीत संकेत जयसिंग फंड (वय 17, रा. दांगट वस्ती, शिवणे) जखमी झाला आहे. संकेत याने याबाबत वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी जगताप आणि संकेत ओळखीचे आहेत. कर्वेनगरमधील दुधाणे लॉन परिसरात फंड आणि त्याचा मित्र थांबला होता. त्या वेळी संकेतचा मित्र सिद्धार्थ कडकेला टोळक्यातील एकाने अडवले. अभिषेक कपाळ याला खुन्नस का देतो, अशी विचारणा करुन टोळक्याने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.
संकेतने भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा टोळक्याने त्याच्या खांद्यावर कोयत्याने वार केला. कोयत्याचा वार हातावर झेलल्याने संकेतची करंगळी तुटली. संकेत आणि त्याचा मित्र सिद्धार्थ यांना मारहाण करुन टोळके पसार झाले. टोळक्याने परिसरात दहशत माजविली. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले आरोपी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक सावंत तपास करत आहेत.