पुणे: नागरिकांना मोफत कायदेविषयक सल्ला, वादांचे त्वरित निवारण, लोकअदालतीच्या माध्यमातून निकाल तसेच शासकीय योजनांची माहिती देण्यासह समुपदेशन करण्यासाठी विशेष फिरती लोकअदालत या उपक्रमाचा शुभारंभ प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आला.
शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात पार पडलेल्या कार्यक्रमावेळी विशेष मोबाईल व्हॅनला हिरवा झेंडा दाखवत त्यांनी या उपक्रमाचे उद्घाटन केले. या वेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील, न्यायाधीश व वकील वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. (Latest Pune News)
पाटील म्हणाल्या की, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने ’न्याय आपल्या दारी’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत ही मोहिम राबविण्यात येत आहे. सद्य:स्थितीत पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर तर लष्कर परिसरात ही सेवा सुरू करण्यात आली असून 23 जूनपासून जिल्ह्यातील 11 तालुक्यांत या सेवेचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे. उपक्रमामध्ये सेवानिवृत्त न्यायमूर्तींचे मार्गदर्शन व सक्रिय सहभाग असणार आहे. पुणे जिल्ह्यातील तसेच विविध तालुक्यांतील पॅनेल वकील, पॅरा लीगल व्हॉलेंटियर्स आणि कायदेविषयक सल्लागारांचाही यामध्ये समावेश असणार आहे.
न्याय म्हणजे केवळ न्यायालयात बसून निर्णय देणे नव्हे, तर लोकांच्या दारी जाऊन त्यांना न्याय मिळवून देणे ही खरी जबाबदारी आहे. ‘न्याय आपल्या दारी’ उपक्रमातून आपण लोकशाहीला खर्या अर्थाने समृद्ध करत आहोत. सामाजिक, आर्थिक किंवा भौगोलिक अडचणींमुळे न्यायालयात पोहोचू न शकणार्या नागरिकांसाठी ही व्हॅन आशेचा किरण ठरणार आहे.
- महेंद्र महाजन, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावीच न्यायसुविधा उपलब्ध होऊन मोठी मदत होणार आहे. एकंदरीत सामाजिक, आर्थिक किंवा भौगोलिक अडचणींमुळे न्यायालयात पोहोचू न शकणार्या नागरिकांसाठी ही व्हॅन आशेचा किरण ठरेल, यात काही शंका नाही.
- अॅड. मोनिका गावडे-खलाने