

नारायणगाव: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेल्या तसेच पर्यटन तालुका म्हणून घोषित करण्यात आलेल्या जुन्नर तालुक्यामध्ये सध्या रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात ओला व सुका कचरा टाकला जात असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. तालुक्यातील प्रमुख मार्गांवर सर्वत्र कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत असून त्यामुळे तालुक्याच्या पर्यटन तालुका या प्रतिमेला मोठा धक्का बसत आहे.
पर्यटकांवरही याचा विपरीत परिणाम होत असून “निर्मल ग्राम जुन्नर” अशी असलेली तालुक्याची ओळख आता धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील नारायणगाव-जुन्नर, नारायणगाव-ओझर, नारायणगाव-आळेफाटा, आळेफाटा-बेल्हे, आळेफाटा-ओतूर, मंगरूळ-निमगाव सावा-नारायणगाव चौदा नंबर तसेच बनकर फाटा-डिंगोरे-ओतूर-जुन्नर या प्रमुख रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग पडलेले दिसत आहेत.
काही ठिकाणी प्लास्टिक, घरगुती कचरा, बांधकामातील अवशेष तसेच कुजणारा ओला कचरा रस्त्याच्या बाजूलाच फेकण्यात येत असल्याने दुर्गंधी पसरत आहे. यामुळे परिसराचे विद्रूपीकरण होत असून पर्यटकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. जुन्नर तालुका हा ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा तालुका मानला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला, अष्टविनायकांपैकी लेण्याद्री व ओझर येथील गणपती मंदिरे, नाणेघाट, दर्या घाट, विविध प्राचीन लेण्या, मंदिरं तसेच जीएमआरटी प्रकल्प, विघ्नहर सहकारी साखर कारखाना यांसारखी अनेक ठिकाणे पाहण्यासाठी राज्यभरातून तसेच देश-विदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने जुन्नर तालुक्यात येत असतात.
याचमुळे सरकारने या तालुक्याला पर्यटन तालुका अशी मान्यता दिलेली आहे ती मान्यताच आता धोक्यात येऊ लागली आहे. पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर सर्वत्र कचऱ्याचे ढीग दिसत असल्याने तालुक्याच्या स्वच्छतेबाबत नकारात्मक संदेश जात आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, जुन्नर पंचायत समितीने ग्रामसेवकांना याबाबत स्पष्ट सूचना देऊन प्रत्येक गावाच्या हद्दीत रस्त्यालगत कचरा टाकण्यास प्रतिबंध करणे गरजेचे आहे. तसेच जेथे कचरा टाकला जात आहे, तो तात्काळ उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींनी पार पाडली पाहिजे. मात्र प्रत्यक्षात या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. रस्त्यांच्या कडेला वाढणाऱ्या कचऱ्यामुळे केवळ पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होत नसून सार्वजनिक आरोग्याचाही धोका वाढत आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा कचरा नाल्यांमध्ये वाहून जाऊन गटारे तुंबण्याची शक्यता असून दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे साथीच्या रोगांचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. जुन्नर तालुक्याची “पर्यटन तालुका” म्हणून ओळख अधिक मजबूत करण्यासाठी स्वच्छता हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. प्रशासनाबरोबरच विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, ग्रामपंचायती आणि स्थानिक नागरिक यांनी संयुक्तपणे पुढाकार घेऊन स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज व्यक्त होत आहे. “निर्मल ग्राम जुन्नर” ही ओळख पुन्हा निर्माण करण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.