

नारायणगाव: जुन्नर तालुक्यातील बोरी गावच्या जाधववाडी परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक नर बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. सोपान जाधव यांच्या शेताजवळ हा पिंजरा लावण्यात आला होता. त्यामध्ये सोमवारी (दि. २०) पहाटेच्या सुमारास बिबट्या अडकला. ही माहिती वनक्षेत्रपाल चैतन्य कांबळे यांनी दिली. वन विभागाच्या माहितीनुसार पकडलेला बिबट्या नर असून त्याचे वय अंदाजे आठ वर्षे आहे. बिबट्याची प्राथमिक वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला सुरक्षितपणे माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून जाधववाडी परिसरात बिबट्याचा वारंवार वावर दिसून येत होता. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी वन विभागाकडे वारंवार तक्रारी करून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली होती. जाधववाडी परिसर हा शेतीप्रधान असून ऊस, भाजीपाला आणि इतर पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या भागात बिबट्यांना आसरा मिळत असल्याचे मानले जाते. परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे पाळीव कुत्रे बिबट्यांनी फस्त केल्याच्या घटना घडल्या आहेत, तसेच काही मेंढपाळांच्या मेंढरांवरही हल्ले झाल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आणि पशुपालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरात अद्यापही नऊ ते दहा बिबटे वावरत असून एक बिबट्या पकडल्याने समस्या पूर्णपणे सुटलेली नाही. पहाटे आणि सायंकाळच्या वेळेस शेतकऱ्यांना शेतात जाण्यास भीती वाटत आहे. दूध व्यवसाय करणारे गवळी, शाळकरी मुले तसेच महिलांना रस्त्यावरून ये-जा करताना बिबट्याच्या हल्ल्याची भीती सतावत आहे. अनेक ठिकाणी बिबटे मानवी वस्तीजवळ दिसून आल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
वन विभागाने परिसरात गस्त वाढवून आणखी पिंजरे लावावेत, बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे बसवावेत तसेच नागरिकांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जाधववाडी परिसरातील सर्व बिबट्यांचा बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
दरम्यान, वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून रात्रीच्या वेळी एकट्याने शेतात किंवा मोकळ्या परिसरात जाणे टाळावे, पाळीव जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत तसेच बिबट्याचा वावर आढळल्यास तातडीने वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पकडलेल्या बिबट्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी परिसरातील बिबट्यांचा वाढता वावर हा वन विभाग आणि स्थानिक प्रशासनासमोर मोठे आव्हान बनला आहे.