हिंगण्यातील जाॉगिंग ट्रॅक दलदलीत!

हिंगण्यातील जाॉगिंग ट्रॅक दलदलीत!

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा : सिंहगड रस्त्यावरील दाट लोकवस्तीच्या हिंगणे खुर्द येथील मुठा कालव्याजवळील जॉगिंग ट्रक झाडेझुडपे, दलदलीच्या विळख्यात अडकला आहे. वाढलेल्या काटेरी झुडपामुळे फिरायला जाणारे नागरिक जखमी होत आहेत. तसेच अनेक दिवे बंद असतात. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ व्यायाम, तसेच चालण्यासाठी येणार्‍या नागरिकांची गैरसोय होत आहे.

डास, माशा अशा कीटकांसह मोकाट कुत्र्यांच्या येथे सुळसुळाट आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ट्रॅकवर दोन ते अडीच वर्षांत झाडेझुडपे वाढली आहेत. याकडे माजी उपमहापौर प्रसन्न जगताप यांनी लक्ष वेधले आहे. दरम्यान, पालिकेने साफसफाईचे काम सुरू केले आहे. तरी झाडाझुडपांची छाटणी करून ट्रॅकची स्वच्छता केली जात नाही.

जगताप म्हणाले, की पालिकेच्या अधिकार्‍यांना वारंवार विनंती करूनही दलदलीत अडकलेल्या ट्रकची आवश्यक सफाई केली जात नाही. या भागात दोन लाखांवर लोकसंख्या आहे. अन्य क्रीडांगण अथवा फिरण्यासाठी जागा नाही. त्यामुळे या ट्रॅकवर नागरिक व्यायामासाठी अवलंबून आहेत.

आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
शहराच्या दाट लोकवस्तीच्या भागात ताप, डेंग्यू अशा आजारांची साथ सुरू आहे. ट्रॅकची नियमित सफाई केली जात नसल्याने डासांचा फैलाव वाढला आहे. त्यामुळे परिसरात साथीचे आजार फैलावण्याची शक्यता आहे. आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news