जागतिक पुस्तक दिन विशेष : अनेक पिढ्या घडविणारे जयकर ज्ञान स्रोत केंद्र !

जागतिक पुस्तक दिन विशेष : अनेक पिढ्या घडविणारे जयकर ज्ञान स्रोत केंद्र !

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ म्हटलं की काही गोष्टी लगेच डोळ्यांसमोर उभ्या राहतात. त्यात विद्यापीठातील निसर्गरम्य परिसर, इतिहासाची साक्ष देणारी दीडशे वर्षांहून अधिक जुनी विद्यापीठाची मुख्य इमारत आणि मागील अनेक पिढ्यांसाठी ज्ञानाचा स्रोत ठरलेले जयकर ग्रंथालय म्हणजेच जयकर ज्ञान स्रोत केंद्र..!

यंदाचे वर्ष हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे 75 वे म्हणजेच अमृतमहोत्सवी वर्ष आहे. तर जयकर ग्रंथालयाचे अमृतमहोत्सवी वर्ष पुढील वर्षी सुरू होणार आहे. विद्यापीठाची स्थापना 1949 मध्ये झाल्यानंतर लगेचच 1950 साली विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत ग्रंथालयाची सुरुवात करण्यात आली. विद्यापीठातील विविध विभागांमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी या ग्रंथालयाची निर्मिती करण्यात आली. पुढे 1957 मध्ये ग्रंथालयाला स्वतंत्र इमारत मिळाली व ग्रंथालयाला विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅरिस्टर मु. रा. जयकर यांचे नाव देण्यात आले.

2017 साली जयकर ग्रंथालयाचे नाव जयकर ज्ञान स्रोत केंद्र करण्यात आले. विद्यापीठ विस्तारत गेले, तसे ग्रंथालयही विस्तारत होते. आज ग्रंथ, छापील नियतकालिके, छापील प्रबंध, हस्तलिखिते, नकाशे, ई ग्रंथ, सांगीतिक ठेवा, फोटो, ई डेटाबेस, ई नियतकालिके आदी 4 लाख 77 हजार ग्रंथांचा संग्रह केंद्रात उपलब्ध आहे. प्रामुख्याने मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत हे ग्रंथ आहेत. या भाषांमध्ये वेगवेगळ्या भाषांमधील भाषांतरित साहित्य उपलब्ध आहे.

दुर्मीळ हस्तलिखिते उपलब्ध
जयकर ज्ञान स्रोत केंद्राच्या प्रभारी संचालिका डॉ. अपर्णा राजेंद्र म्हणाल्या, या केंद्रात विद्यापीठाच्या विविध विभागांकडून सुचविण्यात आलेल्या पुस्तकांची दरवर्षी खरेदी केली जाते. ग्रंथालयातील संख्यात्मक साहित्य दरवर्षी वाढतेच. परंतु गुणात्मक दर्जादेखील टिकविण्याचा आमचा प्रयत्न असतो. या केंद्रात दुर्मीळ हस्तलिखितांपासून ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंत सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध आहेत.

विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने आवश्यक असणार्‍या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील जर्नल विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहेत, त्यासोबतच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ई शोधसिंधू या योजनेमार्फत 2004 पासून 14 ई जर्नल उपलब्ध करून दिली जातात. विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून ई कॅटलॉग उपलब्ध आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news