

पुणे : मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह भाषा वापरत आहेत. मुख्यमंत्री कोणत्या हतबलतेतून जरांगे यांच्यावर कारवाई करण्यास धजावत नाहीत? जरांगे यांच्या धमकीवजा भाषेमुळे कायदा सुव्यवस्थेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यांचे वर्तन नक्षलवादाच्या वाटेवर जाणारे आहे. सरकार त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत गुन्हा का दाखल करत नाही, असा प्रश्न उपस्थित करत सरकारने कायदा सुव्यवस्था सांभाळता येत नसल्यास राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी ओबीसी नेते अँड. मंगेश ससाणे यांनी पत्रकार परिषदेत केली. (Latest Pune News)
जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईबाबत केलेले विधान, त्यांची सत्ता उलटवून टाकण्याची भाषा आदी मुद्द्यांचा अँड. ससाणे आणि मृणाल ढोले-पाटील यांनी पत्रकार परिषदेत समाचार घेतला. मनोज जरांगे यांचे आंदोलन ओबीसींच्या हक्कांवर गदा आणणारे आहे. त्यांचा संघर्ष आरक्षणासाठी नसून, प्रस्थापित राजकीय फायद्यासाठी आहे, असा आरोप त्यांनी केला. ढोले पाटील म्हणाले, ’ओबीसी आरक्षण हे मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास व सर्वेक्षणावर आधारित आहे. राज्य सरकारने कुणबी समाजासाठी 10 टक्के आरक्षण आधीच दिले आहे. आता जरांगे पुन्हा काय मागत आहेत हेच कळत नाही. आरक्षणाच्या नावाखाली ते समाजात फूट पाडण्याचे काम करत आहेत. त्यांची खरी जागा तुरुंगामध्ये आहे.’
ओबीसी आरक्षणात छेडछाड झाली तर आम्हाला आत्मदहनासारखे टोकाचे पाऊल उचलावे लागेल. आम्ही न्यायासाठी उभे आहोत. पण जरांगे यांच्या धमकीशाहीला थारा दिला, तर महाराष्ट्र अस्थिर होईल. सरकारने तातडीने कडक कारवाई करावी, असे सांगत त्यांनी ओबीसी आमदारांवरही टीका केली. ज्या आमदारांना ओबीसींनी निवडून दिले, ते गप्प बसले आहेत. एकातही विरोध करण्याची हिंमत नाही, याकडे अॅड. ससाणे यांनी लक्ष वेधले.