Jamun Honey Research: जांभूळ मध ठरतो रक्तातील साखरेसाठी उपयुक्त; एनसीएल संशोधनातून नवे वैज्ञानिक पुरावे

अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध जांभूळ मधात ग्लुकोज कमी; भेसळ ओळखण्यासाठी ‘केमिकल प्रोफाइलिंग’ पद्धतीचा विकास
Jamun Honey Research
Jamun Honey ResearchPudhari
Published on
Updated on

पुणे: जांभूळ मधामध्ये रक्तातील साखरेवर तुलनेने कमी परिणाम करणारे गुणधर्म असल्याचे आणि त्याचबरोबर शरीराला संरक्षण देणाऱ्या अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याचे पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांच्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. अत्याधुनिक वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या आधारे करण्यात आलेल्या या अभ्यासामुळे जांभूळ मधाला नवी ओळख मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Jamun Honey Research
Balbharati Class 4 English Textbook: चौथीच्या नव्या इंग्रजी पुस्तकातून संवादकौशल्याला चालना; आत्मविश्वासाने इंग्रजी बोलणार विद्यार्थी

एनसीएलचे संचालक डॉ. आशिष लेले, शास्त्रज्ञ डॉ. उदय किरण मारेल्ली यांनी या संशोधनाची माहिती पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष रवींद्र साठे या वेळी उपस्थित होते. डॉ. उदय किरण मारेल्ली यांच्या नेतृत्वाखालील संशोधन गटामध्ये स्नेहल वाघोले, शिरीन मॉन्सी, सपना रवींद्रनाथन यांचा समावेश होता. आशिष लेले म्हणाले, महाबळेश्वरच्या डोंगराळ परिसरातून जमा केलेल्या ८२ अस्सल जांभूळ मधाच्या नमुन्यांचा सखोल अभ्यास करण्यात आला. या नमुन्यांचे विश्लेषण शास्त्रज्ञांनी न्यूक्लियर मॅग्नेटिक रेझोनन्स आणि मास स्पेक्ट्रोमेट्री यांसारख्या जगातील अत्यंत प्रगत वैज्ञानिक विश्लेषण तंत्रज्ञानाचा माध्यमातून केले.

Jamun Honey Research
Maharashtra Fertilizer Booking App: खत बुकिंग ॲपला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; एक लाखांहून अधिक नोंदणी

भेसळयुक्त मधाला बसणार चाप

मधामध्ये होणारी भेसळ ही जगभरात चिंतेची बाब बनली आहे. मधातील फुलांचा अचूक स्रोत शोधण्यासाठी पारंपरिक परागकण विश्लेषण पद्धती अनेकदा अपुरी ठरते. यावर प्रभावी उपाय म्हणून 'एनसीएल'च्या शास्त्रज्ञांनी जांभूळ मधाची ओळख पटवण्यासाठी एक आधुनिक 'केमिकल प्रोफाइलिंग' पद्धत विकसित केली आहे. जांभूळ मध आणि भेसळयुक्त मध यांमधील फरक अगदी अचूकतेने ओळखता येतो. या संशोधनामुळे भारतातील स्थानिक मधाच्या विविध जातींचे बाजार मूल्य वाढेल आणि ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वास संचालक डॉ. लेले यांनी व्यक्त केला.

रक्तातील साखर कमी करण्यासाठी प्रभावकारी

या संशोधनात जांभूळ मधामध्ये ग्लुकोजचे प्रमाण इतर मधांच्या तुलनेत खूप कमी, तर फ्रुक्टोजचे प्रमाण अधिक असते. यामुळे या मधाचे सेवन केल्यावर रक्तामध्ये साखर अतिशय संथगतीने मिसळली जाते. पारंपरिक काळापासून जांभूळ मध मधुमेहासाठी गुणकारी मानले जात असून, या संशोधनामुळे याला भक्कम आधार मिळाला आहे.

Jamun Honey Research
Pune Railway Development Projects: पुण्यासाठी रेल्वे विकासाचा मेगा प्लॅन; आळंदी टर्मिनल, बुलेट ट्रेनसह मोठ्या घोषणा

स्वदेशी मधांच्या जातींना मिळणार नवी ओळख

भारतातील विविध प्रदेशांमध्ये उत्पादित होणाऱ्या मधाची खरी ओळख, त्याचे भौगोलिक मूळ आणि अस्सलता शास्त्रीय पद्धतीने निश्चित करण्यासाठी पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने (एनसीएल) महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. देशातील विविध फुलोऱ्यांपासून तयार होणाऱ्या स्वदेशी मधांचा राष्ट्रीय स्तरावरील माहितीचे संकलन करून डेटाबेस तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी आवश्यक प्रारूप आणि संशोधन प्रक्रिया विकसित केली आहे. यामुळे भारतीय मधाला जागतिक बाजारपेठेत स्वतंत्र ओळख मिळण्यास मदत होणार आहे. एनसीएलचे संचालक डॉ. आशिष लेले आणि शास्त्रज्ञ डॉ. उदय किरण मारेल्ली यांनी याबाबत माहिती दिली. देशातील विविध राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मध उत्पादन होत असले तरी त्याची अस्सलता तपासण्यासाठी सध्या स्वतंत्र भारतीय मानके उपलब्ध नाहीत. त्यामुळे विविध प्रकारच्या मधांमधील रासायनिक वैशिष्ट्ये, गुणधर्म आणि संरचनेचा अभ्यास करून त्यासाठी वैज्ञानिक निकष विकसित करण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात जांभूळ, कारवी, मोहरी यांसह विविध प्रकारच्या मधांचे विश्लेषण करण्यात आले आहे.

विविध जातींच्या मधाच्या माहितीचे होणार संकलन

मधाची चाचणी करण्याची यंत्रणा यापूर्वी देशात नव्हती. स्वदेशी मधाचे नमुने परदेशात पाठवून त्याच्या चाचण्या केल्या जात होत्या. त्यामुळे आपल्या मधाची माहिती परदेशी जात होती. मात्र, आता देशातच मधाच्या चाचण्या करता येतील. प्रत्येक औषधाची 'एनएमआर चाचणी' केली जाते. त्याप्रमाणे मधाचीही करता येईल. याबाबत एनसीएलमध्ये यंत्रणा विकसित करण्यात आल्याचे डॉ. उदय मारेल्‍ली यांनी सांगितले.

Jamun Honey Research
Pune Private Hospital Complaints: खासगी रुग्णालयांच्या मनमानीवर सभागृहात संताप; कारवाईची मागणी

जांभूळ मधाची वैशिष्ट्ये

  • शरीराला फायदेशीर ठरणारे माय्रिसेटीन, केम्पफेरॉल असे एकूण १२ प्रकारचे नैसर्गिक घटक जांभूळ मधात मुबलक हे घटक शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास फायदेशीर मधाचे खराब होण्याचे प्रमाण कमी; दीर्घकाळ टिकते.

  • मधामध्ये ग्लुकोजचे प्रमाण खूपच कमी (१०० ग्रॅम मधात २५.९१ ग्रॅम) आढळले.

  • ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचे एकूण एकत्रित प्रमाणही इतर मधांपेक्षा कमी. या मधाचा 'ग्लायसेमिक इंडेक्स' (रक्तातील साखर वाढवण्याचा वेग) अत्यंत कमी.

न्यूझीलंडमधून येणारा मनुका नावाचा मध दहा हजार रुपये किलो दराने विकला जातो, तर जांभूळ मध केवळ एक हजार ते बाराशे रुपये किलो दराने विकला जातो. न्यूझीलंडच्या मधात असलेले गुणधर्म आपल्या स्वदेशी जांभूळ मधात आहेत. आजवर जांभूळ मध मधुमेहींसाठी गुणकारी असल्याचे म्हटले जात होते. आता नव्या अभ्यासामुळे त्याचा वैज्ञानिक पुरावा उपलब्ध झाला आहे. आपल्या स्वदेशी जांभूळ मधाविषयी समाजात जागृती निर्माण करणे गरजेचे आहे.

डॉ. आशिष लेले, संचालक, एनसीएल

राज्यात मधाचे नेमके उत्पादन किती, मधपाळांची संख्या किती याची नेमकी आकडेवारी उपलब्ध नाही. राज्यात बारा मधाची गावे आहेत. या गावांतून तयार होणाऱ्या मधाची आता एनसीएलकडून चाचणी करून घेतली जाणार आहे. तसेच देशात मधातील भेसळ रोखण्यासाठी त्याची चाचणी करून घेण्याबाबतची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात येईल.

रवींद्र साठे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news