

पुणे: उन्हाळा म्हटले की, अनेक प्रकारचा चवदार रानमेवा बाजारात दाखल होत असतो. त्यातीलच एक रानमेवा म्हणजे गोड-तुरट, जांभळट रंगाचे जांभूळ. गुजरातमधील जांभळानंतर आता कोकणच्या फळांची आवक सुरू झाली आहे. बुधवारी बाजारात दहा किलोंच्या पाच क्रेटसची आवक झाली. त्याला 2 हजार 800 ते 3 हजार 900 रुपयांचा दर मिळाला.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात सावंतवाडीमधून ही आवक झाली. मागील वर्षीच्या तुलनेत दहा ते बारा दिवस विलंबाने जांभूळ बाजारात दाखल झाले आहे. मे महिन्यात कर्नाटक, आंध प्रदेश व अन्य राज्यांतून जांभळाच्या आवकेस सुरुवात होईल, त्यानंतर दर खाली येतील. कोकणातील जांभळाची साल पातळ, तसेच टिकवण क्षमता कमी असते. मात्र, गुजरातच्या तुलनेत अधिक गोड, या जांभळांना राज्यात मोठी पसंती मिळते, अशी माहिती जांभळाचे व्यापारी सागर भोसले यांनी दिली.