Jaggery Adulteration: भेसळयुक्त गुळामुळे आरोग्य धोक्यात; ‌’सेंद्रिय‌’ नावाखाली ग्राहकांची फसवणूक

प्रशासनाची उदासीनता
Jaggery Adulteration
Jaggery AdulterationPudhari
Published on
Updated on

राहू: सणासुदीच्या काळात तसेच आरोग्यासाठी साखरेला पर्याय म्हणून वापरला जाणारा गूळ आता विष ठरू लागल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. स्थानिक बाजारपेठेत मिळणाऱ्या गुळामध्ये मोठ्या प्रमाणावर रासायनिक भेसळ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ‌‘सेंद्रिय‌’ गुळाच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक होत असून, अन्न व औषध प्रशासन केवळ कागदोपत्री सक्रिय असल्याची टीका होत आहे.

गुळाला आकर्षक पिवळाधमक रंग देण्यासाठी मानवी आरोग्यास घातक रसायनांचा सर्रास वापर केला जात असल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय गुळाचे वजन वाढविण्यासाठी आणि पोत सुधारण्यासाठी विविध भेसळीचे पदार्थ मिसळले जात असल्याचेही समजते.

Jaggery Adulteration
Beetroot Crop Loss: उष्णतेचा बीट पिकावर परिणाम; उत्पादनात घट

काही ठिकाणी जुनी, खराब झालेली साखर तसेच रिजेक्ट झालेले चॉकलेट्‌‍स वितळवून गुळामध्ये मिसळले जात असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. गुऱ्हाळांवर अशा पदार्थांचे ढीगही आढळून येत असल्याची माहिती आहे. तसेच, कपड्यांना वापरला जाणारा रंग गूळ अधिक पिवळा दिसण्यासाठी वापरला जात असल्याने कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढत आहे.

सध्या बाजारात सेंद्रिय गुळाला मोठी मागणी असल्याने काही उत्पादक साध्या, भेसळयुक्त गुळावर ‌’सेंद्रिय‌’ असा शिक्का मारून तो चढ्या दराने विकत आहेत. मात्र, या गुळाची कोणतीही प्रयोगशाळा चाचणी झालेली नसते. त्यामुळे ‌’सेंद्रिय‌’ हा दावा केवळ कागदोपत्रीच राहतो.

अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक कायदा अस्तित्वात असला, तरी त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याचे दिसून येते. गुऱ्हाळांवर तपासणी, नमुने संकलन आणि दोषींवर कठोर कारवाई याबाबतीत प्रशासन निष्क्रिय असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. कारवाईच्या नावाखाली केवळ नोटिसा देऊन प्रकरणे थांबवली जात असल्याची टीका होत आहे.

Jaggery Adulteration
Pune Nashik highway traffic jam: पुणे-नाशिक महामार्गाच्या बोटा येथे प्रचंड वाहतूककोंडी

भेसळयुक्त गुळाच्या सेवनामुळे पोटाचे विकार, किडनीचे आजार तसेच दीर्घकाळात कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ग्राहकांनी गूळ खरेदी करताना तो अतिशय चमकदार किंवा पिवळाधमक नसून नैसर्गिक काळपट-तांबूस रंगाचा निवडावा, असा सल्ला जाणकारांकडून दिला जात आहे.

ग्रामीण भागातही नफेखोरीमुळे गुळाच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असून, नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने ठोस कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news