

मंचर: आंबेगाव तालुक्यात वाढत्या उष्णतेचा बीट पिकावर प्रतिकूल परिणाम होत असून, अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. उष्णतेमुळे बीटची फुगवण नीट होत नसल्याने उत्पादनात घट होत आहे.
यासोबतच व्यावसायिक गॅसचा पुरवठा मागणीनुसार होत नसल्याने रेस्टॉरंट व ढाबा व्यवसायही अडचणीत आला आहे. अनेक ठिकाणी गॅसअभावी रेस्टॉरंट व ढाबे बंद ठेवावे लागत आहेत. परिणामी, सॅलडसाठी लागणाऱ्या बीटची मागणी घटली असून, त्याचा थेट परिणाम बाजारभावावर होत आहे.
सध्या बीटला 10 किलोमागे सुमारे 225 रुपये दर मिळत असला, तरी उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. एकरी बीट लागवडीसाठी बियाणे, खते, औषधे आणि मजुरी, यांसह सुमारे 90 हजार ते 1 लाख रुपये खर्च येतो.
साधारण अडीच महिन्यांत पीक विक्रीस तयार होते; मात्र यंदा उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. पेठचे माजी सरपंच संतोष धुमाळ यांनी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीत मागणी घटल्याने उत्पादकांमध्ये चिंता वाढली आहे.
दरम्यान, मंचर येथील वैद्यकीय तज्ज्ञ प्रशांत गाडे आणि प्रीतम गाडे यांनी बीट हा आरोग्यासाठी उपयुक्त भाजीपाला असून, त्याचा नियमित आहारात समावेश करणे आवश्यक असल्याचे सांगितले. उष्णतेमुळे बीटची फुगवण व्यवस्थित होत नाही, त्यामुळे उत्पादन घटते.
खर्च मोठा असूनही मिळणारा दर समाधानकारक वाटत असला, तरी उत्पादन कमी असल्याने एकूण उत्पन्न घटून आर्थिक अडचण निर्माण होत आहे, असे लांडेवाडीतील भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक महेश ढमढेरे यांनी सांगितले.
व्यावसायिक गॅसचा पुरवठा नियमित मिळत नसल्याने रेस्टॉरंट बंद ठेवावे लागत आहेत. त्यामुळे सॅलडसाठी लागणाऱ्या बीटसह इतर भाजीपाल्याची खरेदी कमी झाली असून, बाजारातील मागणी घटल्याचे स्पष्ट दिसत आहे, असे घोडेगाव आशीर्वाद रेस्टॉरंटचे मालक धनंजय फलके यांनी सांगितले.