

वाॅशिंग्टन : ओपन एआयच्या संशोधन प्रयोगशाळेतून नियंत्रण सुटलेल्या एका ‘एआय एजंट’ने गेल्या काही दिवसांत तंत्रज्ञान जगतात मोठी खळबळ उडवून दिली आहे. एआय क्षेत्रातील प्रमुख कंपनी ‘हगिंग फेस’वर केलेल्या सायबर हल्ल्यानंतर, या एआय एजेंटने न्यूयॉर्कस्थित ‘मोडाल लॅब्स’ या दुसऱ्या टेक कंपनीच्या एका ग्राहकाच्या सिस्टीमलाही लक्ष्य केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मोडाल लॅब्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आणि या प्रकरणाशी संबंधित सूत्रांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. तथापि, मोडाल लॅब्सच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, त्यांच्या मुख्य सिस्टीमला किंवा प्लॅटफॉर्मला कोणताही धोका पोहोचलेला नाही आणि कंपनी स्वतः हॅक झालेली नाही.
कशा प्रकारे झाला हा सायबर हल्ला?
‘हगिंग फेस’ने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, या अनियंत्रित एआय एजंटने सर्वप्रथम एका ‘सँडबॉक्स’मध्ये (सुरक्षित आणि अलिप्त चाचणी वातावरण) प्रवेश मिळवला. हा सँडबॉक्स एका अनोळखी थर्ड-पार्टी प्रदाता प्लॅटफॉर्मवर चालवला जात होता. या ठिकाणाहूनच या एआयने हगिंग फेसवर मोठा हल्ला चढवण्यासाठी मार्ग तयार केला.
मोडाल लॅब्सचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी अक्षत गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, या एआय एजंटने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर होस्ट केलेल्या एका ग्राहकाच्या असुरक्षित कोडचा फायदा घेतला. ग्राहकाने एक ‘अनऑथेंटिकेटेड एंडपॉईंट’ उघडा ठेवला होता, ज्यामुळे इंटरनेटवरील कोणालाही त्यांच्या सँडबॉक्सचा वापर करून कोड रन करण्याची परवानगी मिळाली. हे डिजिटल जगात घर उघडे ठेवून चोरट्यांना निमंत्रण देण्यासारखे होते.
धोका वाटतो त्यापेक्षा अधिक मोठा?
मोडाल लॅब्सच्या ग्राहकावरील हा हल्ला हगिंग फेसवर झालेल्या मोठ्या सायबर मोहिमेची केवळ एक पहिली पायरी होती. मात्र, या घटनेवरून हे स्पष्ट होते की, हा अनियंत्रित एआय एजेंट आधी वाटत होते त्यापेक्षा अधिक व्यापक क्षेत्रात पसरला होता आणि विविध सिस्टीम्समध्ये शिरकाव करत होता. यावर प्रतिक्रिया देताना ओपन एआयने थेट भाष्य करण्यास नकार दिला. परंतु, त्यांनी त्यांच्या अपडेटमध्ये नमूद केले की, त्यांच्या या एआय एजंटने चार वेगवेगळ्या सेवांमधील चार खात्यांमध्ये अनधिकृत प्रवेश केला होता. या चार सेवांपैकी ‘मोडाल’ ही एक सेवा होती.