हिंजवडी : आयटीनगरी सापडली अतिक्रमणाच्या विळख्यात

हिंजवडी : आयटीनगरी सापडली अतिक्रमणाच्या विळख्यात
Published on
Updated on

हिंजवडी : राजीव गांधी आयटी पार्क हिंजवडी आणि माण या गावच्या हद्दीत मोकळ्या जागेत किरकोळ विक्रेते आणि फूटपाथवर खाद्य पदार्थ विकणार्‍या विक्रेत्यांनी एमआयडीसीच्या हद्दीतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असल्यामुळे वाहतुकीस मोठी अडचण निर्माण होत आहे.

वाहतुकीचा खोळंबा
आयटी पार्कमधील मुख्य रहदारीचे रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले असल्याने हिंजवडीच्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यावर व पदपथावर खुलेआम अतिक्रमण होऊन दुकाने थाटली जात असल्याचे पाहूनही एमआयडीसीचे अधिकारी कारवाई करण्याऐवजी त्याकडे कानाडोळा करत असल्याचे दिसत आहे.

पदपथावर विक्रेत्यांचा ठिय्या
मुख्य रस्त्यांवर नारळ, ज्यूस विक्रेते तसेच या पथारीवाल्याकडे खरेदीसाठी येणार्‍या ग्राहकांमुळे वाहतूक कोंडीत अधिकची भर पडत आहे. व्यावसायिकांकडून पदपथ गिळंकृत झाल्याने पादचार्‍यांची मोठी गैरसोय होत असून, रस्त्यातील वाहनांना भेटून पादचार्‍यांना वाट काढावी लागत आहे. त्यामुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

खाऊगल्ली, चौपाट्यांत झपाट्याने वाढ
आयटीमध्ये लाखोंच्या संख्येने कर्मचारी येत जात असल्याने विनापरवाना खाऊ गल्ल्या व चौपट्यांची संख्या वाढली आहे. बहुतांश कंपन्यांच्या प्रवेशद्वारावरच विनापरवाना खाद्यपदार्थ व शीतपेयांच्या गाड्या लागत असल्याने यांना रोखणार कोण? असा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे. फूटपाथवर भाजीवाले, फळ विक्रेते, ज्यूस सेंटर व खाद्य पदार्थांच्या हातगाड्यांची गर्दी दिसत आहे.

पदपथ नेमके कोणासाठी?
मुख्य रस्त्यावर रहदारीला अडथळा ठरणार्‍या या अतिक्रमणावर कारवाई का होत नाही, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. आयटीतील मुख्य रस्त्यावर अतिक्रमणे झाली आहेत. एमआयडीसीने तयार केलेले पदपथ पादचार्‍यांसाठी की पथारीवाल्यांसाठी, असाही प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे. रात्री उशिरापर्यंत चालणार्‍या या अतिक्रमणावर कारवाई करण्याचे धाडस एमआयडीसी व पोलिस प्रशासन का दाखवत नाही, असा सवाल आयटीयन्सकडून केला जात आहे.

रस्ते झाले अरुंद
रस्त्यांवर लावण्यात आलेल्या बॅरिकेड्समुळे आधीच आयटीचे मुख्य रस्ते अरुंद झाले आहेत. कोरोना संकटानंतर हिंजवडी आयटी उद्यान फेज 1 येथील मुख्य रस्त्यावर तसेच पदपथावर व्यावसायिकांनी दुकाने थाटलेली दिसत आहेत. आयटी कंपन्या पुन्हा पूर्ववत सुरू झाल्याने हिंजवडीची रहदारी पुन्हा वाढली आहे. तसेच, मेट्रोच्या कामामुळे वाहतूककोंडीत वाढ झाली आहे. मेट्रोमुळे आधीच अरुंद झालेल्या रस्त्यांवर अतिक्रमण वाढल्याने वाहतूककोंडीत अडकून पडण्याची नामुष्की आयटीयन्सवर ओढवत आहे.

या ठिकाणी झालेली अतिक्रमणे

  • माईड ट्री कंपनीसमोर टी जंक्शनजवळ
  • आयटी उद्यानाच्या टी जंक्शन ते मेजा 9 हॉटेलचा रस्ता
  • हिंजवडीचा मुख्य शिवाजी चौक ते मारुंजी रस्ता
  • लक्ष्मी चौक ते फेज 2 कडे व विनोदे नगरकडील रस्ता
  • शिवाजी चौक ते वाकड रस्ता
  • पोलिस ठाण्याच्या मागील बाजूला असलेल्या सब स्टेशनकडे जाणारा आयटीचा रस्ता
  • ब्लूरीज तसेच मेगापोलिस सोसायटीकडे जाणारा रस्ता

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news