ITI to be transformed in two years
पुणे: जागतिक बँकेने कौशल्य व उद्योजकता विभागासाठी 1200 कोटींचा निधी दिला आहे, तसेच आशियाई विकास बँकेकडून 4 हजार 200 कोटींचादेखील निधी मिळाला आहे. पंतप्रधानांनी कौशल्य विकासासंदर्भात तयार केलेल्या योजनेमध्ये राज्यातील 100 -‘आयटीआय’चा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
कंपन्यांनी आयटीआयबरोबर भागीदारी करत ‘आयटीआय’मध्ये ‘स्किल आणि इनोव्हेशन सेंटर’ची स्थापना करावी, कंपन्यांनी त्यांचे अनुभव, ज्ञान देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन औद्योगिक कंपन्यांना केल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. (Latest Pune News)
मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स’ची बैठक पार पडल्यानंतर लोढा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लोढा म्हणाले, ‘आयटीआय आणि औद्योगिक कंपन्या जोपर्यंत एकत्र येणार नाहीत, तोपर्यंत विद्यार्थ्यांचा विकास होणे शक्य होणार नाही.
त्यामुळे औद्योगिक कंपन्यांना एकत्र घेण्यासाठी 70:30 धोरण स्वीकारण्यात आले आहे. यामध्ये शासनाचा 70 टक्के आणि कंपन्यांचा 30 टक्के सहभाग घेण्यासाठी औद्योगिक कंपन्यांच्या प्रतिनिधींबरोबर संवाद साधत त्यांना ‘आयटीआय’बरोबर भागीदारी करण्याचे आवाहन केले.
औंध आयटीआयमध्ये शिक्षकांना प्रशिक्षित केले जाणार आहे. त्यासाठी औंध आयटीआयमध्ये कायमस्वरूपी प्रशिक्षण देण्यासाठी एक इमारत तयार केली आहे. यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी दहा कोटी रुपयांचा निधी दिल्याचेदेखील लोढा यांनी स्पष्ट केले.
आयटीआय प्रवेशाच्या वेळापत्रकाची माहिती घेऊन आवश्यकता असल्यास पुन्हा विद्यार्थ्यांना नोंदणीची संधी देण्यात येईल, परंतु प्रवेशाची एकही जागा रिक्त राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
यंदापासून सहा नवीन अभ्यासक्रम
’आयटीआय’मध्ये यंदापासून सहा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी शासनाच्या उपलब्ध ’आयटीआय’मध्ये जागा उपलब्ध करून देण्यात येणार असून, नवीन मशिनरी मागविण्यात येणार आहे. त्याचबरोबर संबंधित मशिनचे ज्ञान असलेले तज्ज्ञ व्यक्तीदेखील ठेवण्यात येणार आहे.
जेणेकरून मशिन बंद पडल्यानंतर संबंधित व्यक्ती त्या मशिनची देखभाल दुरुस्ती करणार आहे. पाच वर्षांसाठी हा करार करण्यात येणार आहे. इलेक्ट्रिक व्हेइकल, ड्रोन, सोलार, रोबोटिक्स, थ्रीडी मॅन्युफॅक्चरिंग आदी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचेदेखील अधिकार्यांनी स्पष्ट केले.
येत्या 10 दिवसांमध्ये स्वयंरोजगाराची योजना येणार
राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात स्टार्टअप सुरू करण्यात आलेले आहेत; परंतु त्याचा यशस्वी होण्याचा वेग फार कमी आहे. त्यामुळे राज्य सरकार स्वयंरोजगारासंदर्भातील एक स्किम तयार करत आहे. येत्या 10 दिवसांमध्ये संबंधित स्किमचे काम पूर्ण होईल. त्यानंतर संबंधित योजनेची घोषणा करण्यात येणार असल्याचे लोढा यांनी स्पष्ट केले आहे.