

Amruta Fadnavis on Thackeray brothers unity
पुणे: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आले आहेत, याचा आनंद आहे. जिवलग नाती तुटून पुन्हा एकत्र येतात, ही चांगली गोष्ट आहे. कुटुंबासाठी एकत्रित येणे केव्हाही चांगले असते, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी रविवारी (दि.13) दिली.
पुण्यात आयोजित एका पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लाडकी बहीण योजनेबद्दल प्रश्न विचारल्यावर लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकार ही योजना अशीच पुढेही सुरू ठेवेल, असा विश्वास आहे. ही योजना बंद पडणार नाही, असे त्यांनी सांगितले. (Latest Pune News)
महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांबद्दल बोलताना फडणवीस म्हणाल्या की, राज्यात महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांचे चित्र अतिशय दु:खदायक आहे. हुंडाबळी, कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे आजही घडत आहेत.
या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यकर्ते, पोलिस प्रशासन आणि न्यायव्यवस्थेने एकत्र येऊन आणखी ताकदीने काम करण्याची गरज आहे. एकत्र येऊन ठोस उपाययोजना राबवाव्या लागतील. दुसरीकडे प्रत्येकाने आपण पीडित महिलेला साथ देतो का? हा प्रश्न स्वत:ला विचारला पाहिजे.
आपल्या मुलांना महिलांचा आदर करणे शिकवायला हवे. यामुळेच खूप मोठा बदल घडू शकेल. अनेक सामाजिक संस्था पीडित महिलांसाठी काम करीत आहेत, हे काम आणखी वाढले पाहिजे. मानसिकतेत बदल झाला, तरच बदल घडेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यात वारंवार येतात. त्यांचे पुण्यावर जास्त लक्ष आहे, यावर तुम्हाला काय वाटते? या प्रश्नावर फडणवीस म्हणाल्या, ’पुणे ही राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे. पुणे, मुंबई, नागपूर हा सगळाच आपल्या राज्याचा भाग आहे, असा विचार करून देवेंद्रजी काम करतात. सामान्य माणसाला चांगले जगणे मिळत नाही तोपर्यंत देवेंद्रजी पुण्यात येत राहतील. मला फक्त शहरातील समस्या कळतात. भाजपमध्ये काय होते ते भाजपवाल्यांनाच माहिती असते. मी सामान्य नागरिक आहे.’