पिंपरी : खड्ड्यांमुळे अपघात होतात हे म्हणणे चुकीचे : आयुक्त

पिंपरी : खड्ड्यांमुळे अपघात होतात हे म्हणणे चुकीचे : आयुक्त

पिंपरी : रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होतात. खड्ड्यामुळे कोणी पडल्याने ठेकेदाराला जबाबदार धरा, असे म्हणणे चुकीचे आहे. शाहूनगर येथे झालेल्या अपघाताचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. त्यांच्याकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर पालिका योग्य ती कार्यवाही करेल, असा दावा महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी केला आहे. शाहूनगर येथे झालेल्या अपघातात एका शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. पालिका प्रशासनाकडून खड्डे बुजविण्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने विरोधकांनी अधिकार्‍यांना घेराव घातला होता. यासंदर्भात विचारले असता आयुक्त बोलत होते.

शहरातील 60 टक्के खड्डे बुजविले

आयुक्त सिंह म्हणाले की, रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यास ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस सुरुवात केली आहे. आतापर्यंत शहरातील 60 टक्के खड्डे बुजविण्यात आले आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समवेत झालेल्या बैठकीनुसार 31 डिसेंबरपर्यंत शहरातील सर्व खड्डे बुजविण्याचे नियोजन केले आहे.

अधिकार्‍यांवर जबाबदारी निश्चित केली आहे

खोदकाम किंवा कामे करताना सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी व दक्षता घेण्याचा सूचना अधिकार्‍यांना दिल्या आहेत. काम सुरू असलेला सूचना व दिशादर्शक फलक तसेच, दिवे लावावेत. सुरक्षेसाठी खड्ड्याभोवती कुंपण केले जावे. त्याची जबाबदारी संबंधित अभियंत्यांवर निश्चित करण्यात आली आहे. दक्षता न घेतल्यास अधिकार्‍यांवर कारवाई केली जाणार आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news