

पुणे : आपण मॉलमध्ये फिरायला गेलोय... एखादी वस्तू स्वस्त आहे म्हणून आपण गरज नसताना खरेदी करतो, हीच गोष्ट आरोग्याला लागू पडते का? नाही ना! मग केवळ स्वस्तात तपासण्या होत आहेत म्हणून एखादे ‘हेल्थ पॅकेज’ घेऊन आपण वैद्यकीय क्षेत्रातील ‘धंदेवाईक’पणाचे ग्राहक होत आहोत का? याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
वैद्यकीय व्यवसायात अपवाद वगळता धंदेवाईकपणा वाढीस लागला आहे. पैसे कमावण्याच्या नावाखाली नागरिकांना आरोग्य तपासण्यांचे ‘ग्राहक’ बनविले जात आहे. स्वस्तात तपासण्यांच्या नावाखाली रुग्णांच्या जिवाशी खेळण्याची स्पर्धा लागलेली असताना नागरिकांनी सजग राहण्याची गरज अधोरेखित होत आहे.
पॅथॉलॉजिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रसाद कुलकर्णी म्हणाले की, बदलत्या जीवनशैलीमुळे आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आपल्याला काहीतरी आजार झाला आहे, असे प्रत्येकाला वाटत असते. याच मानसिक ताणाचा फायदा घेऊन स्वस्तात तपासण्यांच्या जाहिरातींचा मारा केला जातो आणि लोक त्याला बळी पडतात. आरोग्य तपासण्यांचे ‘ऑल इन वन पॅकेज’ मिळत आहे म्हणून तपासण्या करणे चुकीचे आहे. त्यापेक्षा काही लक्षणे दिसत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासण्या करून घ्याव्यात. उदाहरणार्थ, कुटुंबात मधुमेहाची पार्श्वभूमी असल्यास आणि त्यानुसार काही त्रास असल्यास डॉक्टर तपासणी करतात. त्यानुसार तपासण्यांचा सल्ला दिला जातो. जाहिरातींपेक्षा आपल्या डॉक्टरांवर विश्वास ठेवा.
सध्या अनेक पॅथॉलॉजी लॅबकडून ’डिस्काउंट’ किंवा ’पॅकेज ऑफर’च्या नावाखाली अत्यल्प दरात रक्त तपासण्या केल्या जात आहेत. सोशल मीडियावर, मोबाईल मेसेजद्वारे जाहिरातीतून नागरिकांना या तपासण्या करून घेण्यास प्रवृत्त केले जाते. मात्र, यामागे आर्थिक फायद्यापेक्षा आरोग्याला धोका अधिक आहे.
डॉ. अनिकेत देशपांडे, जनरल फिजिशियन
पॅथॉलॉजिस्ट असोसिएशनमध्ये सुमारे 3 हजार 500 सदस्य आहेत. सर्व तपासण्या तज्ज्ञांकडून केल्या जाव्यात, असा दंडक आहे. आरोग्य तपासण्या एखाद्या आजाराचे निदान करण्यासाठी केल्या जातात. तपासण्यांची गरज आणि अचूकता, या दोन्ही बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे केवळ पॅकेज आहे म्हणून गरज नसताना प्रत्येक वेळी सगळ्या तपासण्या करण्याची गरज नसते.
डॉ. प्रसाद कुलकर्णी, पॅथॉलॉजिस्ट असोसिएशन
आरोग्यदायी आयुष्य जगण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी ही आवश्यक असली, तरी गरज नसताना किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय केलेल्या तपासण्या घातक ठरू शकतात.
काही वेळा मशिनची अचूकता, सॉफ्टवेअर एरर किंवा टेक्निशियनच्या चुका, यामुळे चुकीचे अहवाल मिळण्याची शक्यता असते.
चुकीच्या रिपोर्टनुसार उपचार झाल्यास रुग्णाच्या जिवाला धोका निर्माण होतो.
काही वेळा एखादा तपासणी अहवाल थोडा ’अॅबनॉर्मल’ आला, तरी डॉक्टर त्याचा अर्थ वेगळ्यासंदर्भात लावतो. मात्र, सामान्य माणूस तो रिपोर्ट पाहून घाबरतो आणि चुकीचे निर्णय घेतो.
पॅथॉलॉजी लॅबना अधिकृत मान्यता आहे की नाही, हे न तपासणे जिवावर बेतू शकते. अनुभव नसलेल्या, अल्प प्रशिक्षित कर्मचार्यांकडून नमुने घेतले जातात, त्यामुळे रिपोर्टमध्ये चूक होण्याची शक्यता अधिक असते.