

पुणे : यंदा मे महिन्याच्या मध्यापासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या 10 दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत असल्याने विषाणूजन्य आजारांच्या पाठोपाठ जलजन्य आजारांचा धोकाही वाढला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत टायफॉईड, कावीळ, तीव्र— अतिसाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये तीव्र अतिसाराचे 675, काविळीचे 6 आणि टायफॉईडचे 16 रुग्ण आढळून आले होते. यावर्षी मे महिन्यामध्ये तीव्र अतिसाराचे 760, काविळीचे 14 आणि टायफॉईडच्या 29 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे पाणी उकळून पिण्याचे, खबरदारी घेण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. (pune News Update)
शहरात जानेवारी महिन्यात दूषित अन्न आणि दूषित पाण्यातून गुलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचा प्रादुर्भाव झाला होता. यामुळे मेंदूविषयक गुंतागुंतीसह अतिसार आणि ओटीपोटात वेदना, मज्जातंतूविरूद्ध रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला अशी लक्षणे रुग्णांमध्ये दिसून आली होती. या पार्श्वभूमीवर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जलजन्य आजारांच्या बाबतीत अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित होत आहे.
शहरात जागोजागी पाण्याची डबकी साचल्याने दूषित आणि घाण पाणी साचून राहते.
जलजन्य आजार आणि त्याची लक्षणे काय आहेत?
ताप येणे, डोकेदुखी, जुलाब, ओटीपोटात दुखणे, सांधेदुखी अशी कॉलरा, टायफॉईड, लेप्टोस्पायरोसिस, कावीळ यांसारख्या आजारांची लक्षणे आढळून येतात. विशेषत:, लहान मुले आणि ज्येष्ठांना या आजारांचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
टायफॉईडचा ताप कमी होण्यासाठी किती कालावधी लागू शकतो?
टायफॉईडची लागण झाल्यास ताप, अंगदुखी, थकवा, अशक्तपणा, वेदना अशी लक्षणे दिसतात. ताप कमी होण्यासाठी 1 ते 3 आठवड्यांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती जनरल फिजिशियन डॉ. अपर्णा चव्हाण यांनी दिली.
बाहेरचे दूषित अन्न खाणे, तसेच दूषित पाणी पिणे टाळावे.
घरात आणि आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता राखावी.
शौचालयातून आल्यावर हात-पाय स्वच्छ धुवावेत.
गरज भासल्यास पाणी उकळून प्यावे.