पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घेणे आता शक्य नाही, अशी भूमिका केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी उच्च न्यायालयात मांडली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी आणि अन्य कामकाजात व्यस्त असल्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यास असमर्थ असल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले. मात्र, खंडपीठाने आयोगाचे हे स्पष्टीकरण असमर्थनीय असल्याचे मत व्यक्त करत नाराजी व्यक्त केली.
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक न घेण्याची केंद्रीय निवडणूक आयोगाची कृती बेकायदेशीर असल्याचे सांगतही निवडणूक तातडीने घेण्याचे आदेश द्या, अशी याचिका पुण्याच्या सुघोष जोशी यांनी उच्च न्यायालयात केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. आता पोटनिवडणूक घेतली तरी या पदाचा कार्यकाल वर्षभराने संपुष्टात येईल, असे आयोगाने न्यायालयात सांगितले.
हेही वाचा