पुणे; पुढारी वृत्तसेवा : लोणी काळभोर परिसरात कोयत्याचे स्टेट्स ठेवून दहशत निर्माण करणे चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणी पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हा दाखल केला असून, त्यात तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट सहाने केली. तेजस संजय बधे (वय 19), उदय सिद्धार्थ कांबळे (वय 19), प्रसाद ऊर्फ बाबू धनंजय सोनवणे (वय 19, तिघेही रा. थेऊर, ता. हवेली), रोहित राजू जाधव (वय 20, रा. लोणी काळभोर, ता. हवेली), संग्राम भगवान थोरात (वय 28, रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली), श्याम गुरप्पा जाधव (वय 43, रा. वानवडी, पुणे) तसेच आणखी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
काही जण हडपसर आणि लोणी काळभोर परिसरात सोशल मीडियावर कोयत्याचे स्टेट्स ठेवून दहशत निर्माण करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या मुलांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडील असणारे धारदार कोयते ताब्यात घेतले आहेत. पकडलेल्यांपैकी जाधव याच्याकडे कोयते मिळाले आहेत. कोयत्याचा धाकाने दहशत पसरविण्यात अल्पवयीन मुले आघाडीवर असल्याची गंभीर दखल घेऊन पोलिस प्रशासन हे यापुढे अल्पवयीन मुलांवरदेखील कडक कारवाई होणार आहे.