ओतूर : माळशेज घाटात सध्या रस्त्यावर फेसळणारे धबधबे रांगेत निरंतर कोसळतात. त्यात भिजण्यासाठी राज्यातून पर्यटक गर्दी करताना दिसत आहेत. भिजण्याचा आनंद लुटताना अनेक पर्यटक धिंगाणा घालतात. दुसरीकडे येथे धबधब्यातून लहान, मोठे दगड किंवा दरड कोसळण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे माळशेज घाट पर्यटनासाठी कितपत सुरक्षित आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अहिल्यानगर - कल्याण महामार्गावरील माळशेज घाट अवघ्या राज्यात पर्यटनासाठी प्रसिध्द आहे. यंदा जोरदार पाऊस झाला असून येथील धबधबेदेखील मोठ्या प्रमाणात वाहू लागले आहेत. या धबधब्याखाली चिंब भिजण्यासाठी अनेक पर्यटक येत आहेत. येथील उंच कड्यावरून कोसळणारे धबधबे पाहताना अनेकांना भान रहात नाही. ते भान हरपून एकत्रपणे धबधब्याखाली उभे राहून भिजण्याचा आनंद लुटतात. त्यावेळी त्यांचे येथील धोकादायक कड्यांच्या नैसर्गिक रचनेकडे दुर्लक्ष होत असते. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून येणार्या दरडींचा धोका त्यांना लक्षात येत नाही.
सध्या घाटात कमी-अधिक प्रमाणात सतत पाऊस सुरू आहे. त्यासोबत या परिसरात धुकेही असते. जोराचा पाऊस आल्यास धबधब्यांच्या पाण्याचा प्रवाह अचानक वाढत असतो. ते कुणाच्याही लक्षात येत नाही. त्याशिवाय काही फुटांवरून कोसळणा-या धबधब्यात लहान-मोठे दगडही येतात. तर दुसरीकडे घाटरस्त्याच्या खालच्या बाजूला हजारो मीटर खोल दरी आहे. या दोन्ही गोष्टींचा भिजण्याचा आनंद लुटणार्या, तसेच धिंगणा घालणार्या पर्यटकांसाठी धोका ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात माळशेज घाटात मुंबईहून अहिल्यानगरला जाणार्या रिक्षावर एक मोठा दगड कोसळला होता. त्या घटनेत एक 8 वर्षांचा मुलगा आणि त्याच्या चुलत्याचा जागीच मृत्यू झाला होता. त्याशिवाय यापूर्वी एका एसटी बसवर दगड कोसळून प्रवासी मृत्युमुखी पडल्याची घटना होऊन गेली आहे. असे अपघात माळशेज घाटात वारंवार घडत आहेत, याचे भान मात्र येथील पर्यटकांसह प्रशासनालाही नसल्याचे सध्याच्या येथील स्थितीवरून दिसत आहे.
घाटात कोणत्याही मोबाईलला रेंज मिळत नाही. त्यामुळे घाटात दुर्घटना घडल्यास मदत उशिराने मिळते.
या घाट रस्त्याचे एकूण अंतर 10 किलोमीटर आहे. मात्र, घाटाच्या दोन्ही बाजूला वाहन तपासणी नाके नाहीत.
अपघातानंतर रुग्णांना 30-40 कि.मी.वरील पुण्यातील ओतूर, किंवा ठाण्यातील मुरबाडला न्यावे लागते.
येथील लावलेली लोखंडी जाळी मोठ्या दरडीपुढे तकलादू ठरण्याची शक्यता आहे.
घाटातील रस्ता अरुंद असून त्यावर जागोजागी खड्डे आहेत.
घाटातील रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे सफेद पट्टे किंवा सांकेतिक खुणा नाहीत.
धुक्यामुळे प्रखर रंगाची सिग्नलची व्यवस्था बसवलेली नाही.
घाटासाठी 24 तास चालणारी स्वतंत्र पोलिस यंत्रणा नाही.