पुणे : किराणा माल विक्रेत्या व्यावसायिकाचा विश्वास संपादित केल्यानंतर त्यांनी बँकेत भरण्यासाठी दिलेली तब्बल 12 लाख 27 हजारांची रोकड चोरून नेणाऱ्या कामगाराला खडकी पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून बेड्या ठोकल्या. मागील चार वर्षांपासून आरोपी हा ठिकठिकाणची घरे बदलून राहत होता. रावसाहेब शहराम कराळे (वय 52, रा. धामणगाव, देवीचे, पाथर्डी, अहिल्यानगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बाबुराम भैय्याराम अग्रवाल (वय 60) यांनी फिर्याद दाखल केली होती. ही घटना मे 2021 मध्ये खडकी परिसरात घडली होती.
तक्रारदार अग्रवाल हे किराणा माल विक्रीचे व्यावसायिक असून, त्यांच्याकडे आरोपी रावसाहेब कराळे 2021 सालापासून कामाला होता. त्यामुळे मालकाचा त्याचा विश्वास बसला होता. मे 2021 मध्ये अग्रवाल यांनी त्याच्याकडे 12 लाख 27 हजारांची रोकड बँकेत जमा करण्यासाठी दिली होती. मोठ्या प्रमाणावर रोकड असल्याची संधी साधून आरोपी कराळे हा दुचाकीसह पसार झाला होता. याप्रकाराची माहिती मिळताच खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपीने आपली ओळख लपवत वारंवार ठिकाणी बदलली. पोलिसांना दिशाभूल करत तो चार वर्षे तीन महिने फरार होता.
दरम्यान, आरोपी कराळेच्या कुटुंबातील लोकांनीच तक्रारदाराविरुद्ध अपहरणाचा बनावट गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिस ठाण्यातील पथकाने उबलब्ध तांत्रिक माहिती व इतर माहितीच्या आधारे पोलिस अंमलदार अनिकेत भोसले, सुधाकर राठोड, गालीब मुल्ला, शशांक डोंगरे, यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा ठाव ठिकाणा शोधून काढला. तो छत्रपती संभाजीनगरमध्ये असतानाच त्याच्या मुसक्या पथकाने आवळल्या. पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप फुलपगारे, पोलिस निरीक्षक दत्तात्रय बागवे, पोलिस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले, शशीकांत सपकाळ, ऋषिकेश दिघे, दिनेश भोये, शशांक डोंगरे, प्रताप केदारी, प्रवीण गव्हाणे, शिवराज खेड यांच्या पथकाने ही कारवाई केली.